
सात्रळ |वार्ताहर| Satral
राहाता तालुक्यातील लोणी येथे रयत शैक्षणिक संकुलातील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दोन सुसज्ज इमारतींचा उदघाटन सोहळा दि. 06 जानेवारी 2023 रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
लोणी येथील या शैक्षणिक संकुलात एकूण तीन हजार विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेत आहेत. इंग्रजी माध्यमात इ.1 ली ते 3 री मध्ये एकूण 325 विद्यार्थी, सबंध महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेतील यशासाठी प्रसिद्ध असलेले माध्यमिक विद्यालयात 2335 विद्यार्थी तर विद्यालयास जोडून असलेल्या उच्च माध्यमिक विभागात 355 विद्यार्थी असे एकूण तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी, एनएमएमएस परीक्षा, रयत टॅलेंट सर्च, रयत ऑलिंपियाड परीक्षा इ. विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य पातळीवर अनेक विद्यार्थी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण तर होतात तसेच जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होणारे हे विद्यालय आहे. याच विद्यालयाची एका विद्यार्थिनीची राष्ट्रीय पातळीवर बालवैज्ञानिक स्पर्धेत निवड झालेली आहे. तर विद्यालयाचा इ . 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 2016 साली संबंध महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेला आहे.
अत्यंत तीव्र स्पर्धा असताना सुद्धा हे शैक्षणिक संकुल गुणवत्ते मध्ये परिसरात व जिल्ह्यात सातत्याने पुढे ठेवण्यासाठी 90 हून अधिक सेवाभावी शिक्षक बारा महिने अहोरात्र कष्ट घेत असतात. अगदी मागील महिन्यापर्यंत विद्यालयाचे माजी प्राचार्य जी.टी गमे यांनी 19 वर्षे 3 महिने या विद्यालयाचे नेतृत्व करत विद्यालयास व संकुलास भौतिक सुविधा व गुणवत्ता यांची सांगड घालून विशिष्ठ उंची प्राप्त करून दिलेली आहे. आत्ता त्यांचाच आदर्श ठेऊन संकुलाचे नूतन प्राचार्य एल. सी. रक्टे त्याच उर्जेने संकुलाचे प्रशासन कार्य कुशलतेने सांभाळत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रयत शिक्षण संस्थचे उपाध्यक्ष अरुण कडू, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब केरुनाथ विखे, लोणी खुर्दचे सरपंच जनार्धन घोगरे व इतर सर्व सहकारी कटिबद्ध आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी या सर्वांच्या उपस्थितीत युवानेते किरण कडू, सुधीर म्हस्के, विक्रांत कडू व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.