शरद पवार यांना थांबण्याची विनंती करा म्हणजे मला निर्णय घेणे सोपे राहील - माजी मंत्री पिचड

शरद पवार यांना थांबण्याची विनंती करा म्हणजे मला निर्णय घेणे सोपे राहील - माजी मंत्री पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

माझे वय झाले मी थांबावे असे विरोधक म्हणतात मात्र त्यापूर्वी तुमचे नेते शरद पवार यांना थांबण्याची विनंती करा म्हणजे मला निर्णय घेणे सोपे राहील, असे सांगतानाच ज्यांना संधी देऊन पाटील केला व मोठे केले त्यांनी असे हास्यास्पद वक्तव्य करून ऊस उत्पादकांची दिशाभूल करू नये. भविष्यात यांना मी जवळ करणार नाही हा शब्द माझा आहे. अगस्ती उर्जितावस्थेत आणण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

अगस्ति सहकारी साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील शेतकरी विकास मंडळाच्यावतीने सुगाव बुद्रुक येथे आयोजित मेळाव्यात माजी मंत्री पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव होते. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकरराव देशमुख, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, जालिंदर वाकचौरे, रमेशराव धुमाळ, यशवंतराव आभाळे, सुधाकर आरोटे, सोनाली नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, राजेंद्र डावरे, भाऊसाहेब वाकचौरे, सुनील देशमुख, प्रकाश नवले, भाऊसाहेब खरात, सीताराम देशमुख, सीताराम भांगरे, सयाजीराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, सुनील कोटकर, ज्ञानेश्वर आरोटे आदी उपस्थित होते.

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, तालुक्यातील सर्व महत्त्वाची पदे घेऊन आपल्या सोयरे- धायरे यांचे कल्याण करून आज पिचड साहेबांनी चाळीस वर्षांत काय केले असा प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे. असे सांगताना तालुक्यातील नेतेमंडळींच्या पतसंस्थांमध्ये झालेले घोटाळे बाहेर काढू, प्रचार करताना खालच्या भाषेत बोलायला लावू नका, आमची ती संस्कृती नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात गिरजाजी जाधव म्हणाले, अगस्ती निर्मिती करताना पाण्याची निर्मिती करणारे पिचड साहेब आहेत. तालुक्यात 11 छोटे मोठे धरणे बांधणारे पाणीदार नेते पिचड असल्याचे सांगत त्यांच्यामुळे शेतकर्‍यांचे जीवनमान फुलल्याचे सांगितले. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा पिचड यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

जि. प. भाजपचे माजी गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी लवकरच आरोप करणार्‍या नेत्यांच्या संस्थांची चौकशी करून जनतेसमोर मांडावी. आमदारांचे तिकीट कापण्यासाठी टोळी एकत्र आली असून पिचड साहेबांनी ज्या ऊस तोड कामगाराला जिल्हा बँकेचे अध्यक्ष केले सर्व पदे दिली त्या पिचड साहेबांना स्वार्थासाठी सोडले त्यांना सोयरे धायरे संवर्धन मंडळ असे नाव द्या. तालुक्यात पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्यांची चौकशी लावा, असे आवाहन केले.

शिवाजीराव धुमाळ यांनी ऊस तोड कामगार ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष हा प्रवास माजी मंत्री पिचड यांच्यामुळे झाला असून चासकर, नवले, नाईकवाडी यांच्या संस्थेत झालेले घोटाळे बाहेर काढावे लागतील, असा इशारा दिला.शरद पवार यांना अगोदर घरी बसवा आम्ही साहेबांना घरी बसवतो असे रमेश धुमाळ म्हणाले.

काळू भांगरे यांनी आमदार हे राष्ट्रपती निवडणुकीत काय भूमिका घेणार? हे आदिवासी जनतेला सांगावे असे आवाहन केले.

सीताराम भांगरे यांनी शेतकरी विकास मंडळाला मतदान करा असे आवाहन केले. गेलेली टोळी परत घेऊ नका असे पिंपळदरीचे उपसरपंच राम रंधे यांनी म्हंटले.

डोंगरगावचे माजी उपसरपंच अशोक उगले यांनी जे गेले त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसांना बोलता येत नव्हते असे सांगितले. पांडुरंग नवले यांनी बडवे गेले विठ्ठल मोकळा झाला, टोळीला परत थारा देऊ नका अशी विनंती पिचड यांना केली. यावेळी अ‍ॅड. सदानंद पोखरकर, अनुप्रिता शिंदे, प्रमिला देशमुख, कैलास पुंडे, अंजनाताई बोंबले यांची भाषणे झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com