राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या गुंडगिरीमुळे सामान्यांना शांततेत जगता येईना

भाजपचे उपाध्यक्ष शिंदे यांचा आरोप
राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या गुंडगिरीमुळे सामान्यांना शांततेत जगता येईना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला असल्याचा असा आरोप प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणार्‍या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधार्‍यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत.

सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत.

राज्याचे गृहखाते राष्ट्रवादीकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता दहशतवादास सामोरे जाणार्‍यांवरच कारवाई केली जात असल्याने, सत्ताधार्‍यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com