काळे कारखाना उसाला पहिला हफ्ता 2500 रुपये देणार

आ. आशुतोष काळे || कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा 68 वा गळीत हंगाम सुरू
काळे कारखाना उसाला पहिला हफ्ता 2500 रुपये देणार

कोपरगाव |प्रतिनीधी| Kopargav

मागील तीन गळीत हंगामापासून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम ठेवून 2022-23 च्या गळीत हंगामात गाळपाला येणार्‍या उसाला पहिला हफ्ता 2500 रुपये देणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.

काळे कारखान्याच्या 68 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्याहस्ते विधिवत पूजन करून व गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. आशुतोष काळे बोलत होते.

आ. आशुतोष काळे म्हणाले, मागील तीन महिने ऊस पिकाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषणाचे उसाच्या मुळांचे कार्य मंदावले आहे. अति पाऊस होऊन देखील उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. कार्यक्षेत्रात जास्त प्रमाणात असलेल्या को -265 या उसावर इतर ऊस जातीच्या तुलनेत जास्त प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. मंत्री समितीने 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वत्र पडणारा पाऊस, दिवाळी सण त्यामुळे ऊस तोडणी कामगार उपलब्ध झाले नाहीत आदी कारणांमुळे आजमितिला 40 ते 50 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत.

परतीच्या पावसाने सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊस पिकांचे नुकसान झालेले दिसत नसले तरी टनेज घटण्याचा अंदाज आहे. शेतात आजही पाणी असल्यामुळे उसाने भरलेली वाहने शेतातून बाहेर काढणे अवघड आहे. त्यामुळे हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ऊस शेतात पाणी असल्यामुळे उसामध्ये साखर कमी राहील व त्याचा विपरीत परिणाम साखर उतार्‍यावर होणार आहे. सुरुवातीला साखर उतारा कमी राहील. त्यामुळे जिल्हा बँकेकडून पेमेंटसाठी मिळणारे ड्रॉवल कमी राहतील. या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन येणार्‍या प्रत्येक अडचणीवर मात करून हंगाम यशस्वी करू.

माजी आमदार अशोकराव काळे यांनी आजवर ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना सदैव केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय यापूर्वी घेतले असून 2022-23 च्या गळीत हंगामात येणार्‍या उसाला 2380 रुपये प्र. मे. टन प्रथम हफ्ता असताना देखील पहिला हफ्ता 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून यापुढेही ऊस उत्पादक शेतकरी व कामगार हिताचे असेच निर्णय घेतले जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सूर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com