
शनीशिंगणापूर |वार्ताहर|Shanishingnapur
नेवासा तालुक्यातील शनीशिंंगणापूर येथे शनी अमावास्येनिमित्त काल राज्याच्या कानाकोपर्यातून दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सुमारे 6 ते 7 लाख भाविकांनी दर्शन घेतले. ओरिसाच्या एका शनिभक्ताने एक कोटीहून अधिक रकमेचा 1 एक किलो वजनाचा सोन्याचा तेलकलश शनीदेवास अर्पण केला.
ओरिसाचे मंत्री नवाब दास, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, परिवहन आयुक्त आदींनी दिवसभरात विधिवत शनिपुजा करून दर्शन घेतले.
रायगड येथील भाविकांची पदयात्रा पालखी दाखल होताच पोलीस पाटील अॅड. सयाराम बानकर यांनी शनीप्रसाद देऊन स्वागत केले. शनिशिंगणापूर मार्गावरील चारही मार्गावर भाविकांची गर्दीच गर्दी होती.
सकाळची शनीआरती सभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे व श्री. मेहता यांच्या हस्ते झाली. दुपारची आरती झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा व राकेशकुमार यांच्या हस्ते, तर सायंकाळी तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा व पुण्याचे डॉ. हेगडे यांच्या हस्ते शनिपूजा करण्यात आली.
अध्यक्ष भागवत बानकर, विकास बानकर, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, आप्पासाहेब शेटे, सचिन बेल्हेकर अतिथींचे स्वागत करत होते.
शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली. शनिवारी सकाळी उच्चांकी गर्दी झाली होती. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था चारही मार्गावर नियोजनबद्ध केली तरीही अलोट गर्दीने वाहतुकीचे तीन तेरा वाजले. त्यामुळे तासन्तास वाहतूक कोडी मंदिर परिसरात झाली होती.
या निमित्ताने प्रवेशद्वार, मंदिरपरिसर, शनिचौथरा या ठिकाणी विद्यूत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना दिल्ली, हरियाणा येथील भक्तांकडून प्रसाद व भाविकांच्यावतीने शनिभक्तांना अन्नदानाचे मोफत वाटप करण्यात येत होते.
शनिप्रसाद बर्फी घेण्यासाठी प्रसाद स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती. प्रसादालयाचे विकी लाटे यांनी यांनी व्यवस्था ठेवली होती.
उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, विश्वस्त दीपक दरंदले, योगेश बानकर, आप्पासाहेब शेटे व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते. दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता. शनीदर्शनासाठी दिवसभर गर्दी होती.
गर्दीचे नियोजन उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सहकार्यांनी विशेष पथक पाचारण करून केले.