
शिंगणापूर |वार्ताहर| Shani Shinganapur
अवकाळी पावसाचे वातावरण, करोनाच्या नव्या ओमिक्रॉन अवताराची भीती, एसटीचा संप अशी पार्श्वभूमी असतानाही काल आलेल्या वर्षातील शेवटच्या शनीअमावास्येच्या दिवशी सुमारे दोन लाख भाविकांनी शनीशिंगणापूर येथे दर्शन घेतले.
औरंगाबादचे माजी खा.चंद्रकांत खैरे, पुणे येथील विलास मंडीगेरी यांच्या हस्ते पहाटे विधिवत पूजा करून आरती, शनिदर्शन घेतले.दुपारी 12 वाजता उद्योगपती सौरभ बोरा, संजय गोयल यांचे हस्ते, सायंकाळची आरती दिल्ली येथील महंत कालिदास महाराज यांच्या हस्ते झाली. यावेळी श्रीरामपूरचे माजी आमदरा भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, उपकार्यकारी अधिकारी ओसवाल, नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के आदी होते.तर रात्री पुणे येथील राहुल गोडसे, सांगलीचे बाळासाहेब हजारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
शुक्रवारी रात्री पासून भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बर्यापैकी गर्दी झाली होती. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे भाविकाची गर्दी कमी दिसत होती.शनिचौथर्यापासून काही अंतरावर भाविकांची दर्शन रांगेत विनामास्क भाविकांनी नियमांचे उल्लंघन करून गर्दी केली होती. या निमित्ताने प्रवेशद्वार, मंदिरपरिसर, शनिचौथर्याच्या ठिकाणी विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते. भावी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग व्यवस्था घोडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयात, मुळा कारखानाच्या काही अंतरावर, नगर औरंगाबाद रोडवरील या ठिकाणी करण्यात आल्याने भाविकांना दुरवरून पायी चालत यावे लागत होते. खासगी वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणात असल्याने भाविकांकडून अधिक पैसे आकारण्यात येत होते.
मंदीर परिसरात अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने 50 रक्तदात्याकडून रक्त संकलन करण्यात आले. दिवसभरात मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्यासह अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले. राज्याच्या कानाकोपर्यातून यावेळी कमी भाविक आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले हे व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते. विशेष अतिथींचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते. दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता. यात्रा शांततेत पार पडली.
प्रसादासाठी भाविकांची रेलचेल
यावेळी भाविकांना शनिप्रसाद बर्फी नेण्यासाठी नियोजन नसल्याने अक्षरशः प्रसाद स्टॉल वर रेलचेल करावी लागली. काही शनिभाविक प्रसादाविना परतले. यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती.