शिंगणापुरातील कमिशन एजंटांना हद्दपार करणार

देवस्थान अध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
शिंगणापुरातील कमिशन एजंटांना हद्दपार करणार

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shinganapur

शनीशिंगणापूर येथील कमिशन एजंटांना (लटकू) हद्दपार करण्याचा निर्णय देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आठ दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावर दोन मोटार सायकलच्या धडकेत सोनई ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन दरदले हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन वर्षांपासून देवस्थाने लॉकडाऊनमुळे बंद होती. आता एक महिन्यापासून धार्मिक देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली, भाविकांची गर्दी पाहता तेथील सक्तीची शनिपूजा घेण्यासाठी दूरवरून लटकू भाविकांच्या वाहनांचा भरधाव वेगाने पाठलाग करत असताना निष्पाप लोक बळी पडले आहेत. त्यामुळे शनिभक्तांना मोकळ्या मनाने दर्शन घेता यावे म्हणून शनिशिंगणापूर व रस्त्यावरील लटकू हद्दपार करण्याचा निर्णय शनिशिंगणापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या अगोदर कित्येक वेळा लटकू हटाव मोहीम राबविण्यात आली होती, ती आजतागायत लटकू हटवण्याऐवजी जोरात सुरू आहे. त्यांच्यावर थातुरमातूर कारवाईचा बडगा उगारला जातो, परत जैसे थे, यात कोणाचाही धाक नसल्याने भाविकांना लुटण्याचा फंडा शनिशिंगणापुरात गाळेधारक व लटकू करत आहेत.

बैठकीत भेसळयुक्त तेल वापरू नये, लटकू रस्त्यावर दिसता कामा नये, शनी पूजा वाढीव दर आकारू नये आदी सूचना देण्यात आल्या. यावेळी गाळेधारक, पार्किंग मालक, व्यावसायिक यांनी उपस्थित राहून ठाम निर्णय घेतला.

बैठकीला विकास बानकर, आप्पासाहेब शेटे, शिवाजीराव शेटे, पोपट कुर्‍हाट, शहाराम दरंदले, बाळासाहेब बोरुडे, बाळासाहेब कुर्‍हाट, कार्यकारी अधिकारी जी. के. दरदले, तांत्रिक अधिकारी नितीन शेटे व व्यवस्थापक संजय बानकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com