
सोनई |वार्ताहर| Sonai
शनिशिंगणापुर येथे सोमवती अमावस्या व शनिजयंती सोहळ्यानिमित्त दिवसभरात दोन लाख भाविकांनी भेट देऊन शनिदर्शन घेतले. सोहळ्यानिमित्त महायज्ञ, विविध सामाजिक उपक्रम व आरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.दोन वर्षांच्या खंडानंतर कार्यक्रम झाल्याने भाविक भक्तांत मोठा उत्साह होता.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनिजयंती सोहळ्यानिमित्त जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. तीन दिवसांपासून यज्ञमंडपात मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस पुरोहित हवनाचा विधी करीत आहेत. यजमान म्हणून शनिभक्त जयेश शहा, उद्योजक रामेश्वर सोनी व विश्वस्त सपत्नीक बसले आहेत.
शनिजयंती व सोमवती अमावस्या असल्याने आज पहाटेपासूनच शनिदर्शनासाठी गर्दी झाली होती.
शनीचौथर्यास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदीर परीसरात विद्युत रोषणाई करण्यात आली.सकाळी साडेदहा वाजता श्री क्षेत्र काशी मोटारसायकल कावड यात्रेचे आगमन झाले. गावातून कावडीची मिरवणूक काढण्यात आली होती.
कावडीचे भक्त जगन्नाथ दरंदले, हनुमंत दरंदले, सोपान चव्हाण, भीमराज राऊत, सुभाष ससे व अन्य भक्तांनी शनिमूर्तीस जलाभिषेक केला.
दुपारी बारा वाजता पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी मुर्तीस वस्र व अलंकार घातले. शनिभक्त जयेश शहा, सौरभ बोरा, विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांच्याहस्ते पुजन व मध्यान आरतीचा सोहळा झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन देवस्थानच्यावतीने मंदीर परीसरात मंडप व जमिनीवर मॅट टाकण्यात आली होती.
मंदीराच्या बाजूला अभिषेक मंडप उभारण्यात आला होता. येथे अभिषेक करीता दिवसभर भक्तांची गर्दी होती. दुपारी पद्मश्री पोपटराव पवार व हिवरेबाजार येथील युवकांनी मंडपात बसून अभिषेक केला. त्यांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विनायक दरंदले यांनी केले. यावेळी महावीर चोपडा, पत्रकार सुनिल दरंदले, अशोक शिरसाठ, संतोष चपळे, सुधाकर गडाख उपस्थित होते. सायंकाळी झालेल्या आरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.