
लोणी |प्रतिनिधी| Loni
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मिळवून दिला जात आहे. येणार्या काळात आदिवासी कुटूंबियांसाठी घरकुल योजनांचे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.
जनसेवा फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी विधानसभा मतदार संघातील 285 आदिवासी कुटूंबियांना शासनाच्या खावटी योजनेचा लाभ मिळाला आहे. खावटी योजनेचे हे साहित्य शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात वितरीत करण्यात आले. याप्रसंगी दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, गुलाबराव सांगळे, बापूसाहेब आहेर, शरद आहेर, विजय डेंगळे, पिरमंहमद पटेल, आदिवासी विभागाचे तालुका समन्वयक आंबादास बागुल, किशोर धावणे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
सौ. विखे पाटील म्हणाल्या की, शिर्डी विधानसभा मतदार संघात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे काम यशस्वीपणे होत आहे. सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. आदिवासी वस्तीमधील कुटूंबियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनसेवा फाउंडेशन नेहमीच पुढाकार घेते. कोविड संकटाच्या काळातही सर्वतोपरी मदत करण्याचे काम विखे पाटील परिवाराने सामाजिक बांधिलकीतून केले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड संकटात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने बंद झालेली खावटी कर्जवाटप योजना पुन्हा सुरु करुन, मोठा दिलासा दिला असल्याचे स्पष्ट करुन सौ. विखे पाटील म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा दिलासा आदिवासी कुटूंबियांना मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात 3600 लाभार्थ्यांना तर दुसर्या टप्प्यात 285 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
लोणी येथील आदिवासींच्या घरकुल योजनेचा प्रकल्प राज्यात नावारुपाला आला. त्याच पध्दतीने इतर गावांमध्ये घरकुल योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच हसनापूर येथील घरकुल योजनेच्या कामाची सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अंबादास बागुल यांनी केले तर आभार दिनेश बर्डे यांनी मानले.