बनावट सोन्याचे पितळ आर्थिक गुन्हे शाखा खरडणार

कर्ज फसवणूक प्रकरण तपासासाठी वर्ग
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

कोतवाली पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणाचा तपास सुरू आहे. शहर बँकेत आत्तापर्यंत 8933 ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या प्रकरणी 37 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, 3 कोटी 22 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही कर्जदारांची खाती तपासण्याचे काम सुरू आहे.

तर संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये 8564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात 53 आरोपींचा समावेश असून आत्तापर्यंतच्या तपासणीत 2 कोटी 88 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नागेबाबा मल्टीस्टेटमधील संशयित खात्यांपैकी केवळ 50 ते 60 टक्केच खात्याची तपासणी झाली असून अन्य खात्यांची तपासणी बाकी आहे.

या दोन्ही गुन्ह्यात मिळून सुमारे 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यामार्फत हा तपास केला जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com