आणखी 32 तोळे आढळले बनावट

अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरण
आणखी 32 तोळे आढळले बनावट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी एका कर्ज खात्याची तपासणी केली. यामध्ये 32 तोळे बनावट दागिने आढळून आले आहेत. त्यावर 10 लाख 70 हजारांचे कर्ज घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पूर्वी तपासणी केलेल्या एका कर्जदाराचेच हे खाते असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात आतापर्यंत आरोपींची संख्या 39 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहर बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज घोटाळा चर्चेत आहे. तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. सोमवारी केलेल्या तपासणीमध्ये सुमारे 27 तोळे बनावट सोने आढळले होते. यावर आठ लाख 75 हजारांचे कर्ज घेण्यात आले होते. मंगळवारी केलेल्या तपासणीमध्ये 32 तोळे बनावट दागिन्यावर 10 लाख 70 हजारांचे कर्ज घेण्यात आले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये आतापर्यंत शहर बँकेची सुमारे साडेतीन कोटींच्या पुढे फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान बनावट सोनेतारण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत. अजय किशोर कपाले (गोल्ड व्हॉल्युअर), ज्ञानेश्वर रतन कुताळ व सुनील ज्ञानेश्वर आळकुटे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत. दरम्यान दोघांचे जामीन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

‘त्या’ पतसंस्थांमधील तपासणीकडे दुर्लक्ष

कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या तपासादरम्यान इतर दोन पतसंस्थांच्या पावत्या आढळून आल्या होत्या. त्याचा तपास पोलिसांकडून केला जाणार, असे सांगण्यात आले होते. मात्र, कोतवाली पोलीस ठाण्याकडून या दोन्ही पतसंस्थांना ‘सॉफ्ट कॉर्नर’ दिला जात असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पतसंस्थांमधील तसेच इतर चार ते पाच पतसंस्था व बँकांना कोतवाली पोलिसांकडून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शहर बँक वगळता इतर बँका व पतसंस्थांमधील तपासणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com