
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता नव्या कार्यक्रमानुसार बँकेच्या संचालक मंडळासाठी 29 जानेवारीला मतदान होईल तर 30 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
दरम्यान, मंगळवार (दि. 27) अखेर एकही उमदेवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी दिली. शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. परंतु करोना संसर्ग प्रतिबंधामुळे विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान करोना कालावधी संपल्यानंतर बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार 11 डिसेंबर रोजी मतदान होणार होते.
बँकेच्या 15 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित 13 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 18 उमेदवार होते. बँकेचे सुमारे 12 हजारांवर मतदार आहेत. राज्य सरकारने 30 नोव्हेंबरला सुधारित आदेश काढत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे शहर सहकारी बँकेची निवडणूक आहे, त्या टप्प्यावर स्थगित ठेवून 20 डिसेंबरनंतर निवडणुका घेण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात एका जागेवर बिनविरोध निवडून आलेले संचालक सुनील फळे यांचे निधन झाले. त्यामुळे आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आलेला आहे.
सुधारित कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत- 26 ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी- 2 जानेवारी
- वैध उमेदवारांची यादी- 3 जानेवारी
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत- 3 ते 17 जानेवारी
- मतदान- 29 जानेवारी
- मतमोजणी- 30 जानेवारी.
उमेदवारी प्रक्रियेतील बदल
पूर्वीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी फळे यांचे निधन झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत काही बदल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय कार्यालयाकडून देण्यात आली. त्यानुसार पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे, परंतु ज्यांनी पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केले होते किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यांना पुन्हा नव्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. नव्या उमेदवारांना मात्र अर्ज दाखल करता येतील. पूर्वीचे चिन्ह वाटप रद्द करून पुन्हा नव्याने चिन्ह वाटप केले जाणार आहे. ज्या दोन जागा बिनविरोध झाल्या त्या जागांवरही नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.