सात वर्षांनी नगर शहर बँक निवडणूक रणधुमाळी

सहा नव्या चेहर्‍यांना संधी ? बिनविरोध होण्याची देखील शक्यता
सात वर्षांनी नगर शहर बँक निवडणूक रणधुमाळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

525 कोटींच्या ठेवी व 390 कोटींचे कर्ज येणे बाकी असलेल्या आणि थकबाकी 16 टक्क्यांवर पोहोचलेल्या नगरमधील प्रसिद्ध शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळात यंदा सहा नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. बँकेच्या 15 जागांसाठीची निवडणूक रणधुमाळी आज बुधवारपासून (दि.2) सुरू होणार आहे. करोनामुळे दोन वर्षे मुदतवाढ मिळालेल्या या बँकेची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत आहे. त्यामुळे बँकेच्या राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, बँकेमध्ये तुल्यबळ विरोधक असे कोणी राहिले नसल्याने यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आहे.

स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या शहर सहकारी बँकेत (स्व.) मुकुंद घैसास यांचे एकहाती वर्चस्व होते. 2015 मध्ये त्यांनी त्यांचे परंपरागत विरोधक व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्याशी जुळवून घेत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाचे पॅनेल सत्तेवर आणले. पण दुर्दैवाने नंतर वर्षभरातच प्रा. घैसास यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सीए गिरीश घैसास व गुंदेचा यांनी बँकेचा कारभार सांभाळला.

आता याच जोडीच्या नेतृत्वाखाली यंदाच्या निवडणुकीत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाचे पॅनेल रिंगणात उतरणार आहे. मात्र, त्यांच्यासमोर प्रबळ असे राजकीय विरोधक व तेही एकत्रितपणे असे कोणीही नाही. परिणामी, यंदाच्या रिंगणात अपक्ष जास्त संख्येने उतरण्याची चिन्हे आहेत व बँकेसमोरील आर्थिक अडचणी, वाढती थकबाकी, चौकशा, बनावट सोनेतारण नुकसान वअन्य काही मुद्दे पाहता यापैकी अनेकजण रिंगणातून माघारही घेण्याची शक्यता आहे.

सहा नवे चेहरे येणार

शहर सहकारी बँकेची 2015 मध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या संचालकांपैकी चारजणांचे निधन झाले आहे. प्रा. मुकुंद घैसास, डॉ. रावसाहेब अनभुले, अ‍ॅड. लक्ष्मण वाडेकर व सतीश अडगटलायांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चार जागा तसेच संचालक मच्छिंद्र क्षेत्रे यांनी काही वैयक्तिक कारणाने बँकेच्या संचालकपदाचा दिलेला राजीनामा आणि 2015 मध्ये पहिल्यांदा संचालक होऊन लगेच बँकेच्या उपाध्यक्ष झालेल्या निलिमा पोतदार यांची मागील सहा वर्षात बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकांना असलेली गैरहजेरी यामुळे त्यांचीही उमेदवारी जवळपास रद्द झाली आहे. परिणामी, आता घैसास-गुंदेचा मित्रमंडळाला सहा नवे चेहरे निवडणुकीत उतरवावे लागणार आहेत. ते कोण असतील, निधन झालेल्या संचालकांची मुले-मुली असतील की अन्य कोणी असतील, याचीउत्सुकता नगरच्या राजकीय वर्तुळात आहे.

आजपासून उमेदवारीस सुरुवात

शहर सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी काम पाहत आहेत. आज बुधवारपासून (दि.2) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, ती 9 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 10 नोव्हेंबरला दाखल झालेल्या सर्व उमेदवारीअर्जांची छाननी होणार असून 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. 28 नोव्हेंबरला रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होणार असून त्यानंतर 11 डिसेंबरला मतदान होणार आहे व 12 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

बँकेच्या 15 जागांमध्ये 10 जागा सर्वसाधारण गटातील आहेत. तसेच दोन महिला प्रतिनिधींच्या राखीव जागा आणि एससी, ओबीसी व एसबीसी अशा आणखी तीन राखीव जागा आहेत. ज्यांच्याकडे किमान एक हजार रुपयांचा शेअर (भाग) आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असल्याने असा एक हजार रुपयांचा शेअर असलेले बँकेचे मतदार 12 हजार 110 आहेत. सद्यस्थितीत बँकेची थकबाकी 16 टक्के आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 7 टक्क्यांच्यावर थकबाकी असेल तर सभासदांना लाभांश वाटप करता येत नाही. त्यामुळे यंदा सभासदांना लाभांश मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर बँकेची यंदाची निवडणूक गाजणार की एकतर्फी होणार, याची उत्सुकता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com