मुरळीवर अत्याचार करणार्‍या आरोपीचा जामीन नामंजूर

जिल्हा न्यायालयाचा निकाल : नगर तालुक्यात घडली होती घटना
मुरळीवर अत्याचार करणार्‍या आरोपीचा जामीन नामंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - जागरण गोंधळ करणार्‍या मुरळीवर अत्याचार करणारा आरोपी आकाश मळुराम पोटे (रा. निंबोडी ता. नगर) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश मंजुषा व्ही. देशपांडे यांनी नामंजूर केला आहे. याप्रकरणी मूळ फिर्यादी अत्याचारीत महिलेच्या बाजूने अ‍ॅड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली.

1 एप्रिल रोजी फिर्यादी महिला (मुरळी) जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून आपल्या सहकार्‍यांसह दुचाकीवरून घरी जात असताना तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले होते. त्यावेळी त्या महिलेसह तिच्या सहकार्‍यांना आरोपींनी मारहाण करून नऊ हजार रूपये काढून घेतले होते. याप्रकरणी पीडित मुरळी महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी पोटे याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

आरोपी पोटे याला जामीन मंजूर केल्यास माझ्या जिवीताला धोका होईल, माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन माझ्यावर अत्याचार केला असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अत्याचारातील महिलेने अ‍ॅड. लगड यांच्या मार्फत न्यायालयात केली होती.

विशेष म्हणजे अत्याचारीत महिलेने एका महिला वकिलांच्या मार्फत, माझ्याकडून गैरसमजुतीने फिर्याद दिली गेली असल्याने आरोपीला जामीन मंजूर करण्यास हरकत नाही, असे लिहून दिले होते. अखेर न्यायालयाने वस्तूस्थिती समजावून घेत आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com