
अहमदनगर (प्रतिनिधी)
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पती रोहिदास भानुदास गुंजाळ, सासरे भानुदास नरसू गुंजाळ, सासू सुशीला भानुदास गुंजाळ (तिघे रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव) या तिघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना साधी कैद, अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी ठोठावली आहे.
श्रीरंग नथू उपळकर (रा. रामपूर, न्हावूर, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह रोहिदास गुंजाळ यांच्याबरोबर 17 एप्रिल 2016 रोजी झाला होता. विवाहानंतर मूलबाळ होत नसल्याने तिचा सासरी छळ केला जात होता.
तसेच पती, सासरे आणि सासू यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरावरून पाच लाख रूपये आणण्यासाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून तिने 5 सप्टेंबर 2016 रोजी पेटवून घेऊन आत्महत्या केली. तिचे वडील श्रीरंग उपळकर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात पती, सासरे आणि सासू अशा तिघांविरूध्द हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटलात सरकार तर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. बचावपक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तिघांविरूध्द गुन्हा सिध्द झाला.
तिन्ही आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या खटलात सरकारतर्फे अॅड. गोरक्ष मुसळे, अॅड. अनिल ढगे आणि अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. पोलीस अंमलदार प्रबोध हंचे यांनी परवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.