7 महिन्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगरसेवेचा होणार समारोप

करोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना दिला आधार
7 महिन्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगरसेवेचा होणार समारोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निम्मे शहर हॉटस्पॉट घोषित झाले. तसेच संपूर्ण नगर टाळेबंदीमुळे ठप्प होते.

याप्रसंगी 7 मित्रांनी एकत्रित येऊन एक मेसेज पाठविले, कोण उपाशी असेल तर 9423162727 या नंबर ला संपर्क करावा, मेसेज व्हायरल झाले. पहिल्या दिवशी 350 जेवणाचे पाकीट घरा-घरातून तयार करून देण्यात आले. यानंतर अनेक भागात राहणार्‍या हातावार पोट असलेल्या सर्वसामान्य कामगार व नागरिकांची भूक भागवण्यासाठी 22 मार्च पासून कोणीही उपाशी राहू नये यासाठी सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती आणि पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या मागील साडेसात महिन्यापासून लंगर सेवा सुरू झाली.

सर्व व्यापार व उद्योगधंदे बंध असताना ही सेवा सुरू करण्यात आली आणि आजही ही सेवा अविरतपणे सुरू आहे. सध्या जनजीवन सुरळीत होत असताना रविवार दि.8 नोव्हेंबर पासून ही लंगरसेवेचा समारोप होणार आहे. तर वेळ पडली तर पुन्हा उभे राहून मदतीचा हात देण्याची तयारी लंगर सेवेच्या सेवादारांनी दर्शवली आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य बाजारपेठसह निम्मे शहर हॉटस्पॉट झाले होते. हॉटस्पॉट व टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडून हातावर पोट असलेल्या कामगार, विद्यार्थी, एकटे राहणारे वयस्कर यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. ही जाणीव ठेऊन 22 मार्च पासून लगंर सेवेच्या वतीने अन्नाचे पाकिट पुरविण्याची सेवा सुरु करण्यात आली. तसेच 2350 गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या प्रमाणात किराणा किटचे वाटप करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही सेवा सध्या चालू असून, नागरिकांना सुरवातीला दोन वेळेस आणि 1 जुलै नंतर संध्याकाळचे एक वेळचे जेवण दररोज देण्यात आले.

पोलीस मुख्यालय येथील सभागृहात हायजनिक पध्दतीने व फिजाकल डिस्टन्सचे पालन करुन जेवण बनविण्यात येत आहे. या लंगरसेवेला 31 ऑक्टोबर रोजी 223 दिवस पुर्ण होत असून, 4 लाख 25 हजार डबे आज पर्यंत वितरीत करण्यात आल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. सदर उपक्रम पोलीस अधिक्षक मनोज पाटील, तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके आणि विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

लंगरसेवेत हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, किशोर मुनोत, करन धुप्पड, राजा नारंग, सनी वधवा, जस्मितसिंह वधवा, सिमर वधवा, टोनी कुकरेजा, राहुल बजाज, सुनिल मेहतानी, रोहित टेकवानी, संदेश रपारिया, नारायण अरोरा, गुरभेजसिंग, शरद बेरड, पुरुषोत्तम बिट्टी, प्रमोद पंतम, कैलाश नवलानी आदि सेवादार म्हणून काम पाहत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com