सात बाजार समित्यांना अटींसह उद्यापासून परवानगी

नेप्ती, वडगावपान, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर अन् श्रीगोंद्याचा समावेश
सात बाजार समित्यांना अटींसह उद्यापासून परवानगी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील नगरच्या नेप्ती उपबाजार समिती, संगमनेरमधील वडगावपान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील बाजार समितीमध्ये जिल्हा प्रशासनाने काही ठराविक वेळेसाठी सुरू ठेवण्यास सवलत दिली आहे. याठिकाणी सकाळी 7 ते 11 या वेळेत कांदा वगळून भाजीपाला, फळे, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री उशीरा काढले आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या काही प्रमाणात खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बाजार समितीमध्ये सकाळी 7 ते 11 यावेळेत कांदा विक्री वगळून भाजीपाला, फळे, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करता येतील. मंगळवार (दि.25) मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे आदेश लागू होतील. काही प्रमाणात व्यवहार खुले करण्यास परवानगी मिळालेल्या बाजार समित्यामध्ये नगरच्या नेप्ती उपबाजार समिती, संगमनेरमधील वडगाव पान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, कोपरगाव व श्रीगोंदा यांचा समावेश आहे.

या ठिकाणी अटी शर्तीसह सर्व व्यापारी, नोकर वर्ग, हमाल, मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी बाजार समितीने करावी व त्यास अनुसरुन पास देणेबाबत कार्यवाही करावी. संबंधित बाजार समितीने पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घ्यावा व आवश्यक त्या नियमांचा पालन न करणार्या संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी. मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाजार समिती आवारात प्रवेश देवू नये.

एका वाहनासोबत वाहनचालक व केवळ एका शेतकर्यास प्रवेश देण्यात यावा. बाजार समितीत प्रवेश करण्यापूर्वी वाहन चालक व सोबतची व्यक्ती यांची थर्मामीटर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी. तसेच प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था बाजार समितीने करावी. रिटेल/सर्वसामान्य ग्राहकांना बाजार समिती आवारात प्रवेश देवू नयेत. बाजार समितीमध्ये समन्वयक म्हणून संबंधित तालुक्याचे उप अथवा सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करावी. हा आदेश 31 मे पर्यंत लागू राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com