अबब! दोन एकर उसात तब्बल सात आंतरपीक

अबब! दोन एकर उसात तब्बल सात आंतरपीक

ब्राम्हणी येथील आप्पासाहेब हापसे यांनी कष्टातून फुलविला मळा

उंबरे (वार्ताहर) - राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील सर्वसामान्य शेतकरी आप्पासाहेब काशिनाथ हापसे यांनी दोन एकर उसाच्या खोडव्यात तब्बल सात प्रकारची विविध पिके आंतरपीक म्हणून घेतले आहे. हापसे यांनी कष्टातून फुलविलेल्या मळ्यातून आंतरपिकातील शेतीमालाची विक्री थेट शेतातून होते. विशेष म्हणजे अख्ख्या कुटुंबाचे हात या काळ्या मातीत राबत असल्याने लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वतःच्याच शेतीत रोजगार निर्माण केला आहे.

हापसे यांना जेमतेम अडीच एकर शेती आहे. त्यांनी दोन एकर उसाचा खोडवा राखला. यापूर्वी सुरू उसात लागवडीत गहू, कोबी, मका हे पीक आंतरपीक म्हणून अनेकवेळा घेतले. यंदा तब्बल सात प्रकारचे आंतरपीक म्हणून काकडी, गवार, पालक भाजी, मुळा, कोथिंबीर, मेथी भाजी, कोबी यासह मका हे आंतरपीक घेतले आहे. एवढी अंतरपिके घेवूनही मुख्य असलेल्या ऊसपिकाची वाढ अतिशय जोमात आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुरेसा वेळ आहे. त्यामुळे खुरपणी वरच्यावर सुरू असल्याने ऊस अन् सर्व आंतरपीक जोमात आहे. कीडरोग फवारणी व्यतिरिक्त गवताचा एकही फवारा नाही. खुरपणीचा दुहेरी फायदा जनावरांना गवत म्हणून चाराही होतो. पालक भाजी अन् काकडी काढणी पंधरा तीन दिवसापासून सुरू आहे. गवार आठदिवसापासून निघायला सुरुवात झाली.कोबी आगामी दहा-बारा दिवसात एकाचवेळी निघेल. दरम्यान मका एकाचवेळी तोडून मूरघास तयार करण्याच्या विचारात आहे. कोथिंबीर अन् मेथी भाजी उसाच्या खोडव्यात आतापर्यंत दोनवेळा घेतली.

आठ दिवसात विक्रीसाठी उपलब्ध होईल. उसात आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठवडे बाजार बंद असला तरी हात विक्री करण्यास सोपे जाते.सात आंतरपिकाऐवजी एकच पीक असते. तर एवढा माल एकाचवेळी विकणे कठीण झाले असते. सर्व थोडेथोडे असल्याने ते शक्य होत आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हाताला काम मिळाले. पर्यायाने थोडा फार का होईना, पण हक्काचा स्वतःच्या शेतात रोजगार उपलब्ध झाला.

ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ दाट लोकवस्तीचा परिसर आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत मालाची विक्री थेट शेतातून होते. ग्राहकांना किरकोळ विक्रीसह हातविक्री करणार्‍यांना माल दिला जातो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com