अहमदनगर (प्रतिनिधी) -

रस्त्याकडेला अथवा मार्केटमध्ये पत्र्याचे शेड ठोकून दुकानदारी करणार्या टॅक्सचोरांचा शोध महापालिकेने सुरू केला आहे. पहिल्या

आठवड्यातच तब्बल साडेसातशे टॅक्स चोर महापालिकेच्या हाती लागले आहेत. 26 जानेवारीपर्यंत महापालिका शहरात टॅक्सचोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती उपायुक्त (कर) संतोष लांडगे यांनी दिली.

शहरात दोन लाखांवर घरे असले तरी त्यातील केवळ लाखभर घरांचीच महापालिकेकडे नोंद आहे. अर्थात त्यांच्याकडूनच महापालिका टॅक्स वसुली करते. मात्र, महापालिकेची परवानी न घेता अनेकांनी घरे/दुकाने सुरू केली आहेत. दुकानदारांकडून महापालिका व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकरणी करते. त्यामुळे महापालिकेचा टॅक्स चुकविण्यासाठी दुकानदारांनी पत्र्याचे शेड ठोकून दुकानदारीचा नवा फंडा सुरू केला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर वादळी चर्चा झाली. त्यानंतर महापालिकेने पत्र्याच्या शेडमधील दुकानदारीची शोध मोहीम हाती घेतली. शहरातील मालमत्ता बिल वाटप करणार्या कर्मचार्यांवर एकाचवेळी ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कर्मचार्यांनी पहिल्या आठवड्यातच 750 टॅक्सचोर दुकानदार महापालिकेच्या पथकाला आढळून आले आहेत. आणखी 26 दिवस ही शोध मोहीम सुरू राहणार आहे. प्रत्येक कर्मचार्याने किती अवैध पत्रा शेडची दुकाने शोधली याची माहिती 26 तारखेपर्यंत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

डबल दंड

महापालिकेची परवानगी न घेता पत्र्याचे शेड ठोकून दुकानदारी करणार्यांकडून डबल शास्ती (दंड) आकारणी केली जाणार आहे. महापालिका अधिनियम 276 अ अंतर्गत मालमत्ता कर आणि दुप्पट शास्तीमाफीची तरतूद आहे. या नियमाचा आधार घेत विना परवाना पत्र्याच्या शेडमध्ये दुकानदारी करणार्यांना मालमत्ता कर अधिक डब्बल दंडाचा भुर्दंड पडणार आहे.