सिव्हीलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र आयसीयू

आ. संग्राम जगताप घेणार पुढाकार। बालरोग तज्ज्ञांसमवेत बैठक
सिव्हीलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र आयसीयू

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना धोका आहे. मात्र गरज भासल्यास लागणारे व्हेंटीलेटर कमी आहेत. ही बाब शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडताच आ. संगग्राम जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू सेंटर उभारले जाईल, असे आश्‍वासन दिले.

आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत शहरातील प्रमुख नामवंत बालरोग तज्ज्ञांची बैठक आज झाली. महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सचिन जाधव, विपुल शेटीया, डॉ.नानासाहेब अकोलकर, डॉ.सुचित तांबोळी, डॉ. प्रताप पटारे, डॉ.मकरंद धर्मा, डॉ.संदीप गायकवाड, डॉ.गणेश माने, डॉ.दिपक कर्पे, डॉ.सुरेंद्र रच्चा, डॉ.सागर वाघ, डॉ.सचिन वहाडणे, डॉ. दिलीप बागल, डॉ.श्याम तारडे, डॉ.चेतना बहुरूपी, डॉ. सोनाली हिवाळे बैठकीला उपस्थित होते.

सुरूवातीला डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी सांगत उपचाराबद्दल माहिती दिली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसर्‍या लाटेचा धोका आहे. 108 रुग्णवाहिकेत पॅडियाट्रीक व्हेंटीलेटर्स नाहीत. हॉस्पिटलमध्ये ते फारसे नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून बालकांना नगरमध्ये आणताना गैरसोय होऊ शकते. पावसाळ्यात फ्ल्यू आणि निमोनियांचे पेशंट वाढतात. त्यामुळे बालकांना इन्फ्लुंझा लस देण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली. त्यावर लसीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलून मार्ग काढू असे आमदार जगताप यांनी सांगितले. शहरातील डॉक्टर-महापालिका अशी संयुक्त झूम ऑनलाईन मिटींग घेतली जाईल असे सांगत आमदार जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू तयार करण्याचे आश्‍वासन दिले.

बालरोग तज्ज्ञांचाही टास्कफोर्स

बाधित बालकांवर उपचाराच्या पध्दतीसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरीता नगर शहरात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार केला जाईल. महापालिका आरोग्य समितीच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यरत असेल. हा टास्कफोर्स जिल्ह्यातील इतरही डॉक्टरांना उपचाराचे मार्गदर्शन करेल. पालकांची काळजी या विषयावर डॉक्टरांसोबत नगरकरांची ऑनलाईन मिटींग घेण्याचा निर्णय यावेळी झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com