निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी समिती अभ्यासक्रमाची निर्मिती पूर्ण

निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी समिती अभ्यासक्रमाची निर्मिती पूर्ण

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय, अशा स्तरावर कर्मचार्‍यांसाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम आणि आशय निश्चिती करून वाचन साहित्य संपादन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) संपादन समिती नियुक्त केली आहे. या समितीत अधिव्याख्याता, सेवानिवृत्त प्राचार्य, कनिष्ठ अध्यापक, मुख्याध्यापक, कनिष्ठ प्राध्यापक अशा 15 जणांचा समावेश आहे.

वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी निश्चितीसाठी वाचन साहित्य चार गटांच्या माध्यमातून विकसित केले आहे. त्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद स्तरावर अभ्यासक्रम, वाचन साहित्य यांचे संपादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही संपादन समिती नियुक्त केली आहे. समितीत वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी समितीत वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम आणि आशयाचे वाचन साहित्य संपादन करणे, साहित्यात सुसूत्रता आणणे, शासनाची ध्येये व धोरणे यानुसार वाचन साहित्यातील आशय व मजकूर योग्य प्रकारे असल्याची खात्री करणे, अशा पद्धतीने समितीची कार्यकक्षा असणार आहे, असे परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय, अशा चार स्तरावरील कर्मचार्‍यांसाठी सेवेच्या बारा वर्षांनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि यातील निवडक निकष पात्र व्यक्तींना 24 वर्षांनंतर निवड श्रेणीसाठी हे प्रशिक्षण आवश्यक आहे. संपादन समितीच्या माध्यमातून तयार केलेल्या अभ्यासक्रम मसुद्याची त्यातील घटकाची योग्य ती छाननी करणे, त्यातील सुसंगती तपासणे आणि शासनाच्या अपेक्षित ध्येय धोरणानुसार ती आहे किंवा नाही, याची खात्री करून योग्य शिफारस प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

या समितीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे भाषा विषयाची उपविभागप्रमुख डॉ. राजेश बनकर व आयटी विभागाचे उपविभाग प्रमुख योगेश सोनवणे, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विषय सहाय्यक संदीप वाकचौरे, प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता मनीषा यादव (भंडारा), सरस्वती सूर्यवंशी (धुळे), पवन मानकर, प्रशांत डावरे (अमरावती), अधिव्याख्याता चंद्रकांता साळुंके, सुनील बावस्कर (नाशिक), सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. उमेश प्रधान, कनिष्ठ प्राध्यापक अजय महाजन, अध्यापकाचार्य डॉ. प्राची चौधरी, कनिष्ठ प्राध्यापक गोविंद कुलकर्णी आणि मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांचा समावेश आहे.

राज्यात लवकरच प्रशिक्षण-

त्यातील बारा वर्षे व 24 वर्षे सेवा केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी या वर्षापासून ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी रुपये 2000 फी निर्धारित करण्यात आली होती. त्यानंतर हजारो शिक्षकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. प्रशिक्षण नसल्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यात अडचणी आल्या होत्या. यापूर्वी प्रशिक्षणाची गरज नसल्याचेही शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सदरचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आल्याने संपूर्ण शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आल्याने लवकरच प्रशिक्षण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com