जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये पूर्ववत सवलत द्यावी

प्रवासी महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव
जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये पूर्ववत सवलत द्यावी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्र सरकारच्या स्थायी समितीने जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये पूर्ववत सवलत सुरु करावी, असा ठराव प्रवासी महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड व सचिव अरुण वाघमारे उपस्थित होते. बाबासाहेब भालेराव (नगर) यांनी स्वागत केले. सभेत वार्षिक जमा खर्च व ऑडिट यास मंजुरी देण्यात आली.

सभेत प्रामुख्याने रेल्वे प्रश्नावर चर्चा होऊन करोना महामारी काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात होत्या परंतु जेष्ठ नागरिकांना जी प्रवासाची सवलत होती ती पुन्हा सुरु करण्यात आली नाही. ती सुरु करण्याची देशभरातून जोरदार मागणी होत आहे. केंद्र सरकारच्या स्थायी समितीने ही सवलत सुरु करण्याची रेल्वे मंत्रालयाला शिफारस करण्यात आली असून रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांचेे ठरावाद्वारे लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे श्रीगोड यांनी सांगितले. ही काढण्यास इतर आर्थिक उत्पन्नाचे पर्याय शोधावेत असेही विविध उपाय सुचविण्यात आले आहे.

यावेळी संजय पोवार (कोल्हापूर), सुरेश पारख (धुळे), बाबा पाठक (नंदुरबार), दत्ता शेळके (नाशिक), कचरुलाल वर्मा (परभणी), दत्तात्रय काशीद, सचिन चंदन, किशोर कुलकर्णी (अहमदनगर) यांनी चर्चेत भाग घेऊन एसटी, रेल्वे प्रश्नावर सूचना केल्या. करोना काळातील सर्व पॅसेंजर बंद केल्या त्या सुरु करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी जनतेला आर्थिक भूर्दंड बसत आहे. देशभरात असे अनेक रेल्वे मार्ग आहेत कि त्या क्षेत्रातील प्रवाश्यांना रेल्वे शिवाय पर्यायच नाही त्यासंदर्भात रेल्वेने विचार करण्याची गरज आहे.

विशाखापट्टणम, बीड-परळी रेल्वे मार्गाला जोडणारा मुरबाड, माळशेज घाटमार्गे अहमदनगरच्या रेल्वे मार्गास रेल्वे बोर्डाने संमती द्यावी व राज्य सरकारने 50 % निधी देण्याचा प्रस्ताव द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करून त्यांचे लक्ष वेधण्याचे यावेळी ठरले. प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रेल्वे व बस प्रवाश्यांच्या अडचणी या विषयावर झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गासाठी नाशिक विभागीय ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे तसेच जिल्हा अध्यक्ष सुधीर काटकर यांनी परिश्रम घेतले. दत्ता शेळके यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com