नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

केंद सरकारने ठरवून दिलेला हमी भाव व ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणेच कारखान्यांनी साखर विक्री करावी.

हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी तंबी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, देशांतर्गत अतिरीक्त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, साखरेची किंमत देशांतर्गत बाजारपेठेत स्थिर व्हावी तसेच ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे कारखान्यांकडून दर मिळावा याकरीता केंद्र शासनाने शुगर केन (कंट्रोल) ऑर्डर 2018 नुसार दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत 3100 रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेली आहे.

तसेच बाजारातील साखरेचा मागणी पुरपवठयातील समतोल साधण्याकरीता खुल्याबाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी यासाठीचा साखर विक्रीचा दरमहा कोटा ठरवून दिलेला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करु नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करणेत येऊ नये अशा सूचना संदर्भातील निर्देशानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित केलेल्या आहेत.

त्यानुसार साखर कारखान्याने दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी. तथापि वरील बाबींची अंमलबजावणी न करणे म्हणजे शासनाच्या साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणाचे उल्लंघन आहे . तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. शुगर केन (कंट्रोल) ऑर्डर 1966 मधील तरतूदींचे उल्लंघन निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिली आहे.

सदर सूचनांचे साखर कारखान्यांनी पालन न केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल आणि याबाबतचा अहवाल केंद्र शासनास कळविण्यात येईल तसेच यासंदर्भात राज्यातील पोलीस विभागास देखील योग्य ती दखल घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.