बीडला जाणारे सहा हजार किलो गोमांस पकडले

संगमनेरच्या एकासह तिघांवर गुन्हा: 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीडला जाणारे सहा हजार किलो गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन जाणार्‍या टेम्पोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरणगाव-जामखेड रोडवर पकडले. या टेम्पोमध्ये नऊ लाख रुपये किमतीचे सहा हजार किलो गोमांस आढळून आले. पथकाने गोमांस, टेम्पो असा 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक केली आहे.

टेम्पो चालक नदिम आयूब मन्यार (वय 39 रा. संगमनेर), मुजफ्फर आयुब शेख (वय 31 रा. खडकत ता. आष्टी जि. बीड), रईस जब्बार शेख (रा. खडकत) असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नदिम व मुजफ्फरला पोलिसांनी अटक केली आहे. आरणगाव-जामखेड रोडने जामखेडच्या दिशेने रईस शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार मन्सूर सय्यद, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजय साठे, सचिन देवडे, आबासाहेब आवारे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार आरणगाव-जामखेड रोडवरील आरणगाव चौक येथे पथकाने सापळा लावला. सोमवारी रात्री 11 वाजता जामखेडच्या दिशेने जाणार्‍या संशयीत टेम्पोला पथकाने पकडले. टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पोमध्ये गोमांस मिळून आले. पोलिसांच्या पथकाने पंचासमक्ष टेम्पोचा पंचनामा करून टेम्पो, गोमांस ताब्यात घेतले. टेम्पो चालक मन्यार व त्याच्यासोबतचा मुजफ्फर शेख याला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात भादवि 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (क) आणि 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर कनेक्शन ?

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल करून बाहेरच्या जिल्ह्यात गोमांसची विक्री केली जात आहे. यामध्ये संगमनेर आघाडीवर आहे. मध्यंतरी येथील कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. दरम्यान टेम्पोमधून गोमांसची वाहतूक करणारा चालक संगमनेरचा रहिवासी असल्याने सदरचे गोमांस संगमनेरवरून बीड जिल्ह्यात जात असल्याचा अंदाज आहे. सदरचे गोमांस रईस शेख याच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यात घेऊन जात असल्याचे टेम्पो चालक मन्यार व मुजफ्फर शेख यांनी पोलिसांना सांगितले आहे. रईस शेख हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, गोमांस कुठून आणले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com