गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी पैसे घेतले; गुन्हा दाखल

गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी पैसे घेतले; गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास लावावा यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या मुलीच्या नातेवाईकांवरच गुन्हा दाखल करुन गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी पैसे घेतल्याचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह एका पत्रकारावर दाखल झाला आहे. घेतलेल्या दीड लाख रुपयांच्या रकमेपैकी सव्वालाख रुपये दुसर्‍या दिवशी परत केल्याचेही जबाबात म्हटले आहे.

याबाबत मुलींच्या आजोबांनी दिलेल्या जबाबानुसार नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात म्हटले की, मला दोन मुले असून त्यापैकी एक मुलगा त्याच्या कुटूंबासह अंतरवाली ता. नेवासा येथे राहत आहे. माझी नात अंतरवाली येथून बेपत्ता झाली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याबाबत मुलगा, पुतण्या व मी नेवासा येथे पोलीस ठाण्याकडे आलो होतो. मी बाहेर थांबलो होतो तर मुलगा व पुतण्या दोघे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या केबिनमध्ये गेले होते.

त्यानंतर फोनवर विचारले असता दोघांनी आम्हाला कोंडून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघे बाहेर आल्यावर त्यांना विचारले असता त्यांनी आज पोरगी गेली उद्या बायको जाईल असे बोलून जेलजवळील पेट्यांवर बसवून ठेवले व काही वेळाने सोडून दिल्याचे सांगितले. त्यानंर आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुंडे यांच्याकडे जावून हा प्रकार सांगितला.

आम्ही 10 मे रोजी दुपारी माझ्या भावासह दोघेजण नातीच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलो असता पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या केबिनमध्ये गेलो तिथे आमच्याआधी पत्रकार सुनील गर्जे बसलेले होते. त्यावेळी श्री. पवार यांनी आमच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची कलमे वाचून दाखविली. आम्ही काहीतरी करा असे म्हणालो असता ते काहीतरी वजन ठेवावे लागेल असे म्हणाले. त्यानंतर गर्जे आम्हाला केबिनच्या बाहेर घेवून आले व अडीच लाख रुपये लागतील असे सांगितले. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यावर दीड लाख रुपयांत ठरले. सायंकाळी दीड लाख रुपये गर्जे यांच्याकडे दिले.

11 मे रोजी सायंकाळी गर्जे यांचा फोन आला की तुमचे दिलेले पैसे तुम्ही घेवून जा. त्यामुळे मी त्या दिवशी कुकाणा येथे सुनील गर्जे यांच्या घरी गेलो. तेथे त्यांनी माझ्यासोबत नेवाशाला चला तिथे पैसे देतो असे म्हणाले. मी त्यांना आता खूप उशीर झाल्याचे म्हणालो असता तुम्ही येथेच थांबा मी नेवासा येथे जावून पैसे घेवून येतो असे मला म्हणाले. त्यानंतर मी कुकाणा येथून अंतरवाली येथे गेलो. त्याचदिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गर्जे हे आंतरवाली येथे आले व माझ्याकडे सव्वालाख रुपये देवून निघून गेलो.

मुलीच्या आजोबांनी दिलेल्या या जबाबावरून नेवासा पोलिसांनी या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व सुनील गर्जे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 384, 385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मिटके करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com