माध्यमिक शाळांशी संलग्न पाचवीचे वर्ग अखेर बंद

पुढील वर्षापासून पाचवीचे प्रवेश नाही, शिक्षकांचे होणार समायोजन
माध्यमिक शाळांशी संलग्न पाचवीचे वर्ग अखेर बंद

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

शिक्षण हक्क कायद्यामुळे करण्यात आलेल्या सरचनेप्रमाणे माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या

पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून प्राथमिक शाळांना जोडण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर व नववी ते बारावी माध्यमिक स्तर अशी रचना स्वीकारण्यात आली आहे.मात्र राज्यात यापूर्वी माध्यमिक शाळांना मान्यता देताना पाचवी ते दहावी आठवी ते दहावी अशी देण्यात आलेली आहेत.

गेल्या काही वर्षांपासून प्राथमिकला मान्यता देताना पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशी देण्यात येत आहेत. राज्यात मात्र कायद्याप्रमाणे शाळांच्या संरचनेत बदल करण्याची आवश्यकता असल्याने माध्यमिक शाळांना जोडून असलेले पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चौथीपर्यंतच्या शाळांना किंवा खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत.

यामुळे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत पाचवीचा वर्ग उपलब्ध होणार आहेत. तसेच केवळ आठवी ते बारावी मान्यता असलेल्या शाळांचा आठवीचा वर्ग ही सातवीपर्यंत असलेल्या शाळेत जोडण्यात येणार आहे.

शिक्षकांचे होणार समायोजन

शासनाच्या नवीन आदेशामुळे खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील वर्ग बंद होणार असल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होणार असले, तरी संबंधित शिक्षकांचे समायोजन त्याच संस्थेत करण्यात यावे .तेथे जागा नसल्यास दुसर्‍या खाजगी संस्थेत करण्यात यावे आणि दुसर्‍या संस्थेत जागा नसेल तरच स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.तथापि हे समजत करताना अंशतः अनुदानित शाळेतून पूर्णत: अनुदानित किंवा वाढीव टप्प्यावर अनुदानित ,नागरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजन करण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी संनियंत्रण अधिकारी

स्थानिक परिस्थितीप्रमाणे नियोजन करून शासकीय किंवा खासगी अनुदानित, अंशत:, अनुदानित ,माध्यमिक शाळेतून पाचवीचा वर्ग प्राथमिक स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळेत ,खासगी अनुदानित, अंशता प्राथमिक शाळेत टप्प्याटप्प्याने जोडण्यात यावे. जिल्हा स्तरावर व जिल्हा अंतर्गत कार्यवाही नियोजन व समायोजन करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. हे समायोजन करताना वेतनाचा शासनावर आर्थिक भार पडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वर्ग वाढणार शिक्षक कमी होणार

राज्यात इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चौथीला जोडून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यात इयत्ता पाचवीच्या तुकड्या वाढतील, मात्र त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा भार पडणार नाही .वाडी वस्तीवर हे विद्यार्थी पाचवीच्या वर्गात समायोजन होणार असल्यामुळे 60 विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षक या न्यायाने पाचवीचा वर्ग सुरू झाला तरी तेथे शिक्षक देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे अनेक वाडीवरील विद्यार्थी एकत्र येऊन महसूली गावात पाचवीचा वर्ग सुरू केल्याने तेथे शिक्षक देणे अनिवार्य ठरत होते. या शासन निर्णयामुळे शासनाचा खर्चात बचत होणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com