माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी थांबवा

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची धरणे
माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी थांबवा

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शिक्षक व शिक्षकेतर यांच्या प्रलंबित मागण्या, तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी थांबण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय शिक्षक व शिक्षकेतरांची कामे केली जात नसल्याचा व दप्तर दिरंगाईचा आरोप करून जोरदार निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, चांगदेव कडू, एम. एस. लगड, प्रशांत होन, संभाजी गाडे, संजय देशमाने, हरिश्चंद्र नलगे, राजेंद्र गवांदे, रावसाहेब शेळके, आत्माराम दहिफळे, वाल्मिक रौंदाळे, बाळासाहेब निवडुंगे, बद्रीनाथ शिंदे, रावसाहेब चौधरी आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माध्यमिक शिक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करून वेळोवेळी निवेदन देऊन देखील सुधारणा होत नाही.

शिक्षक व शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न कार्यालयात प्रलंबित आहेत. दप्तर दिरंगाई होत आहे. शिक्षण उपसंचालक यांच्याबरोबर झालेल्या सहविचार सभेचे इतिवृत्त देखील देण्यात आले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण उपसंचालक व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त अद्याप मिळालेले नाही, कलाध्यापक यांच्या प्रमोशनबाबत किती मान्यता बाकी आहेत व शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रत्येक प्रकरणात दप्तर दिरंगाई होत असल्याबाबत खुलासा करण्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

तर शिक्षक, शिक्षकेत्तरांची रखडलेली मेडिकल बिले, फरक बिले तातडीने अदा करावी, एनपीएस व डीसीपीएस धारक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता देण्यात यावा, शिक्षक शिक्षकेतर यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला जमा करावे, पर्यवेक्षक मुख्याध्यापक यांच्या मान्यता त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com