
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी दालनात छताचे प्लॅस्टर कोसळले. त्यामुळे दालनातील संगणक, टेबलवरील काचा, तसेच इतर काही वस्तू फुटल्या. सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्याने यात कोणीही मोठी दुर्घटना झाली नाही.
दरम्यान, ही जुनी इमारत असून हा विभाग येथून हलविण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग जुन्या इमारतीत आहे. या इमारतीची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात त्याचे छत गळते. कर्मचार्यांना अक्षरक्षा फायलींवर प्लॅस्टिक कागद टाकून कामकाज करावे लागते. याशिवाय इमारतीच्या भिंती, स्लॅबही कमकुवत झाल्याने पावसाळ्यात ही इमारत आतून-बाहेरून ओली होते. जीव मुठीत ठेवून कर्मचारी येथे काम करतात. त्यामुळे हा विभाग येथून दुसरीकडे हलवावा किंवा इमारतीची दुरूस्ती तरी करावी, असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे दिलेला आहे. परंतु अद्यापही त्याची दखल घेतली गेलेली नाही.
बुधवारी सकाळी 10 वाजता जेव्हा शिपायाने हे दालन उघडले, तेव्हा छताचे प्लॅस्टर कोसळलेले होते. त्यामुळे रात्रीच केव्हातरी हे प्लॅस्टर कोसळले असावे, असा अंदाज कर्मचार्यांनी बांधला. दरम्यान, प्लॅस्टरचा तीन ते चार इंच जाडीचा हा थर असल्याने टेबलवरील काचा, तसेच कॉम्प्युटरही फुटले. हे दालन उपशिक्षणाधिकार्यांचे असल्याने येथे अभ्यागतांचीही वर्दळ असते. दिवसा ही घटना घडली असती तर अभ्यागत, कर्मचार्यांना मोठी इजा झाली असती. दरम्यान, इमारतीचे सर्वच छत पावसाच्या पाण्याने फुगलेले असून केव्हाही कोसळेल, अशी त्याची स्थिती आहे. या घटनेने इमारत दुरूस्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.