शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा

संपाचा दुसरा दिवस || दुचाकी रॅली काढून शाळा बंदचे आवाहन
शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी दुचाकी रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करण्यात आले. तर नगर पंचायत समिती कार्यालयासमोर जुन्या पेन्शनसाठी चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला.

या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, राज्य कार्याध्यक्ष अन्सार शेख, सुधीर काळे, दत्ता पाटील कुलट, राजेंद्र निमसे, शेखर उंडे, बाळासाहेब पिंपळे, गोवर्धन पांडुळे, राजेंद्र ठोकळ, आबासाहेब लोंढे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, प्रशांत नन्नवरे आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रारंभी सकाळी माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर शिक्षक-शिक्षिका एकत्र जमले होते. जमलेल्या शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून दुचाकी रॅली काढली. रॅलीद्वारे शिक्षकांनी ठिकठिकाणी जाऊन शाळा बंदचे आवाहन केले. शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करीत दुचाकीचे रेल्वे स्थानक जवळील नगर पंचायत समितीच्या कार्यालयात समारोप झाला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शन व इतर मागण्यांबाबत दुर्लक्ष करणार्‍या सरकारचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.

यावेळी जमलेल्या आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारून जोरदार निदर्शने केली. या संपातून माघार घेणारे शिक्षक नेते संभाजी थोरात यांचा सर्व शिक्षकांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

समितीच्या पत्रकाची होळी

शासकीय कर्मचार्‍यांचा बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशी (बुधवारी) शासनाने शासन निर्णय काढून जुन्या पेन्शनसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या पत्रकाची होळी केली. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा तोंडाला पाने पुसण्याचे काम बक्षी समितीकडून केले गेले त्याच सदस्याची पुन्हा नव्याने नियुक्ती करून शासनाने कर्मचार्‍यांचा भावनेचा कडेलोट केल्याची मोठी खंत कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सुभाष कराळे, विकास साळुंखे, अभय गट, विजय कोरडे, विलास वाघ आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com