शास्त्रज्ञावर हल्लाप्रकरणी राहुरी विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

सुरक्षा अधिकारी पसार; साथीदार अटकेत
शास्त्रज्ञावर हल्लाप्रकरणी राहुरी विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी विद्यापीठाचाच सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ रघुनाथ शेटे याच्यासह तीनजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात शास्त्रज्ञ डॉ. राहुल नवनाथ देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरक्षा अधिकारी शेटे याचा साथीदार भास्कर उर्फ नानासाहेब काचोळे यास अटक करण्यात आली असून सुरक्षा अधिकारी शेटे हा पोलीसी कारवाईचा सुगावा लागताच पसार झाला आहे. या घटनेमुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोसई. गणेश शेळके, यांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सुरक्षा अधिकारी शेटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेटे याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हा हल्ला शेटे यानेच केला असल्याचे अनुमान पोलिसांनी काढले.

रविवारी सायंकाळी डॉ. देसले यांच्यावर चारचाकी वाहनातून आलेल्या चारजणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली होती. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यावरून राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे चक्र फिरविले.

त्यात ही घटना उघडकीस आली असून शेटेच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून सुरक्षा अधिकारी पसार झाला आहे. याप्रकरणी शेटे याच्यासह तीनजणांवर गुन्हा रजि नंबर व कलम 559/2020, भादंवि. 307, 353, 332, 333, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यापिठाचे कुलसचिव हे फिर्यादी देसले यांचे वर्गमित्र व त्यांच्या गावचे असल्याबाबत शेटे याने समज करून घेऊन देसले यांनी कुलसचिव यांना शेटे यांचे विषयी सांगितल्यामुळे शेटे यांच्याकडे असलेला विद्यापीठाचा सुरक्षा अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला, असा शेटे याचा समज होऊन त्या गोष्टीचा बदला घेण्याचे उद्देशाने इतर तीन आरोपी यांच्यासह पांढर्‍या रंगाची विना नंबरची स्विफ्ट डिझायर कारमध्ये एकत्र येऊन देसले यांना जीवे ठार मारण्याचा कट रचून त्यांच्यासोबत इतर तीन इसमांसह विद्यापीठात येऊन देसले हे सरकारी काम करीत असताना त्यांना अडथळा आणला व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायटरने त्यांच्या डाव्या गालावर व डाव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. देसले यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई. शेळके करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com