करोना नियम पाळत उद्यापासून स्कूल चले हम !

सुमारे दोन वर्षांनंतर भरणार पहिली ते चौथीचे वर्ग
करोना नियम पाळत उद्यापासून स्कूल चले हम !

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना प्रभाव कमी झाल्याने आता जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळांची घंटा गुरुवार (दि. 11) पासून पुन्हा वाजणार आहे.

यात पाचवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू झाले होते. परंतु पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग करोनामुळे सुमारे दोन वर्षांनंतर भरणार आहेत. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण 6 हजार 327 शाळा असून, त्यात 8 लाख 91 हजार 505 विद्यार्थी संख्या आहे.

दरम्यान, राज्य सरकारने पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपविला असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत परवागीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागीतलेली आहे. मात्र, परवानगीच्या फाईलवर मंगळवारी सायंकाळपर्यंत सही झालेली नव्हती. तर पाचवी ते बारावीचे वर्ग आधीपासून सुरू झालेले असून त्यांना अडचण नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

करोना स्थितीमुळे पहिल्या व दुसर्‍या लाटेत गेल्या दीड-पावणेदोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. करोना रुग्ण संख्या कमी झाल्याने 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर 20 ऑक्टोबरपासून वरिष्ठ महाविद्यालयेही सुरू करण्यात आली.

दरम्यान, पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू नव्हते. शासन पातळीवर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूचक वक्तव्य शिक्षणमंत्र्यांनी दिवाळी आधी केले होते. त्यातच 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

करोनाचे सर्व नियम पाळून व पालकांचे संमतीपत्र घेऊन 11 नोव्हेंबरपासून चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा ठराव अखेर सभेत करण्यात आला. दरम्यान, प्रारंभी दिवाळीची सुटी 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान होती. परंतु नंतर ती कमी करून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर अशी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा आता 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

दिवाळीची सुटी संपल्यानंतर 11 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. यात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुमारे दोन वर्षांनंतर भरत आहेत. याबाबत शिक्षण विभागाने सर्व तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद

दिवाळीच्या उर्वरित सुट्या नंतर ?

स्थानिक पातळीवर शिक्षण विभागाने दिवाळीची सुटी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर अशी जाहीर केलेली आहे. परंतु नंतर शिक्षक संचालकांनी नवे परिपत्रक काढून या सुट्या 20 नोव्हेंबरपर्यंत वाढविल्या. परंतु याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकार्‍यांना दिले. त्यानुसार काही जिल्ह्यात तेथील शिक्षणाधिकार्‍यांनी सुट्या वाढविण्याचे आदेश काढले. परंतु नगर जिल्ह्यात सुट्या वाढविण्याचा आदेश निघालेला नाही. त्यामुळे शाळा 11 नोव्हेंबरलाच सुरू होतील. परंतु अजूनही काही शिक्षक सुटीबाबत संभ्रमात आहेत. दरम्यान या सुट्ट्या जिल्ह्यातील शिक्षकांना नंतर देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com