शाळा सुरूच राहणार

हिवरेबाजारच्या पालक-विद्यार्थी सभेत निर्णय
शाळा सुरूच राहणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविड संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आदर्शगाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरूच राहणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या पालक-विद्यार्थी सभेत घेण्यात आला.

पालकांनी आम्ही मुलांची काळजी घेत जबाबदारी घेऊ असे सांगत शाळा सुरू ठेवण्यात यावी असे मत मांडले. तर विद्यार्थ्यांनी हातवर करून शाळा सुरू ठेवण्यात याव्यात याबाजूने पाठिंबा दिला. जर शाळा बंद केली तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करू असाही इशारा विद्यार्थ्यांनी दिला. यानंतर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

करोनाच्या तिसर्‍या लाटेतील रोजची वाढती रूग्णसंख्या पाहता राज्य शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षणक्षेत्रात आणि पालकांत नाराजीचा सूर आहे. विशेषतः शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी सभेत हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत बोलताना पद्मश्री पवार यांनी सांगितले की, ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणच्या शाळा बंद करू नयेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच शाळा अचानक बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान करणारे आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. पालकांनी जबाबदारी घेतली तर शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. शासनाने निर्बंध आणताना अनेक व्यवसायांना 50 टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. किमान असेच 50 टक्क्यांचे धोरण शाळांबाबत घेतले पाहिजे, मात्र शाळा-महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवणे शैक्षणिक क्षेत्राचे विशेषतः विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यातून कधीही भरून न निघणारे नुकसान होत विद्यार्थ्यांचे भविष्य संपेल असे मत पद्मश्री पवार यांनी मांडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com