शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

8 वी ते 12 वी पर्यंतच्या तीन महिन्यानंतरही 211 शाळा सुरू
शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्या गावात करोना रुग्ण महिन्यांभरापासून नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 8 ते 12 वी च्या अशा 211 शाळा सुरू असून त्यात 17 हजार 945 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या शाळांचा आकडा वाढतांना दिसत नसून शाळांंना अद्याप विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आहे.

करोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर करोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यात 15 जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. त्यावेळी पहिल्या दिवशी (16 जुलैला) 149 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर 30 जुलैअखेर जिल्ह्यात 194 शाळा सुरू झाल्या होत्या. त्यात 16 हजार 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण 1 हजार 242 शाळा आहेत. त्यात 85 जिल्हा परिषदेच्या व 1 हजार 157 इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. 24 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 211 शाळा सुरू असून त्यात 17 हजार 945 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. म्हणजे शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी सुरू झालेल्या शाळांचा आकडा वाढतांना दिसत नाही. अजूनही हजाराच्या आसपास शाळा बंद आहेत.

3 हजार 439 शिक्षकांचे लसीकरण

जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण 1 हजार 242 शाळा असून त्यात 5 हजार 369 शिक्षक आहेत. त्यातील 3 हजार 439 शिक्षकांनी करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत.

तालुकानिहाय शाळा

अकोले 43, संगमनेर 27, कोपरगाव 4, राहाता 33, राहुरी 8, श्रीरामपूर 21, नेवासा 16, शेवगाव 12, पाथर्डी 11, जामखेड 3, कर्जत 6, श्रीगोंदा 4, पारनेर 6 आणि नगर 8 अशा प्रकारे 211 शाळा सुरू आहेत.

Related Stories

No stories found.