3 किमी अट असतानाही 5 वी सुरू करण्याचा घाट
सार्वमत

3 किमी अट असतानाही 5 वी सुरू करण्याचा घाट

अनुदानित शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होणार?

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

एका गावात एका पेक्षा दोन शाळा असतील आणि जर या दोन शाळांमधील अंतर तीन किमीपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी इतर संस्थांनी इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करू नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून काही शाळांमधून इयत्ता 5 वीचे वर्ग सुरू करण्याबाबत घाट घातला जात असल्याने आपल्याच शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे.

यासाठी शिक्षकांमध्ये व शाळांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे अनुदानित शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षक संख्या धोक्यात येऊ शकते.

1 एप्रिल 2010 पासून राज्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 लागू झाला आहे. त्यानुसार 1 ली ते 8 वीपर्यंतचे शिक्षण प्राथमिकमध्ये संरचीत करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता 4 थीपर्यंतच्या शाळेत 5 वी व 7 वी पर्यंतच्या शाळेत 8 वीचे वर्ग जोडण्याबाबत 2 जुलै 2013 च्या शासन निर्णयानुसार ठरले होते. तशी काही शाळांना मान्यताही देण्यात आली.

मात्र यासाठी तीन किलोमीटर अंतराची अट असतानाही वर्ग सुरू होऊ लागल्याने जवळच्या खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊन शिक्षकांची पदे अतिरीक्त होऊ लागली आहेत.त्यामुळे साहजिकच या अतिरीक्त शिक्षकांच्या वेतनाचा भार शासनावरच येत होता. याबाबत काही शैक्षणिक संस्थांनी न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत.

यासर्व गोष्टी शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने शासनाने 19 सप्टेंबर 2019 रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 5 वी 8 वी चे वर्ग जोडण्याबाबत आदेश पारीत केला असून त्यात निकष ठरवून देण्यात आले आहेत. या आदेशानुसार हे वर्ग जोडण्यास स्वयंअर्थसहायीता तत्वावरच मान्यता देण्यात येईल.

हे वर्ग जोडण्यासाठी 5 वीच्या वर्गासाठी 30 व 8 वीच्या वर्गासाठी किमान 35 विद्यार्थी संख्या आवश्यक राहील. एकापेक्षा जास्त शाळा असल्यास वर्ग जोडता येणार नाही. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासणी करून निर्णय घ्यावा. वर्ग सुरू करण्याबाबत विहीत पटसंख्येइतक्या पालकांची मागणी असावी. अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मात्र तरीही काही शाळांकडून नियम धाब्यावर बसवून 5 वीचे वर्ग सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. शिक्षक संख्या कमी होऊ नये म्हणून विद्यार्थी आपल्याच शाळेत यावेत यासाठी शिक्षकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. विद्यार्थी आपल्याच शाळेत यावेत यासाठी विविध प्रलोभनांचा पालकांसह त्यांच्यावर पाऊस बरसत आहे.

त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांची चंगळ होते आहे हे खरे असले तरी गुणवत्तेचे काय? हा प्रश्न मात्र कायम आहे. दरम्यान मागील वर्षी तालुक्यात 15 जूनलाच जि. प. प्राथमिक शाळेत सुमारे 12 ठिकाणी 5 वी, एका ठिकाणी 8 वी चे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर 19 सप्टेंबरला हा आदेश निघाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com