शाळेविषयी पालक व शिक्षकांसमोर चिंता वाढली

आरोग्य विभागाकडून काही शिक्षकांचे तपासणीचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नाही
शाळेविषयी पालक व शिक्षकांसमोर चिंता वाढली

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शासनाने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. सर्वच शाळांची घंटा वाजेल हे अपेक्षित होते. मात्र करोना तपासणीनंतर काही शिक्षक पॉजिटिव्ह निघाल्याने

पालकांसमोर धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तसेच आरोग्य विभागाने काही शिक्षकांचे तपासणीचे अहवाल तब्बल 10 दिवसांनंतर दिले नसल्याने शाळेची घंटा वाजण्यावर परिणाम झाला आहे.

दीपावलीच्या सुट्टीतच दि. 18 नोव्हेंबरपासून करोना तपासणी सुरू झाली. सुट्टी असूनही शिक्षक तपासणीसाठी गेले. मात्र कधी कीट संपले, तपासणीचे ठिकाण बदलले म्हणून शिक्षकांवर चकरा मारण्याची वेळ आली. स्वॅब दिल्यानंतर दि. 23 पर्यंत तपासणी अहवाल येईल ही अपेक्षा फोल ठरल्याने वर्गात अध्यापन करण्यास शिक्षकांना जाता आले नाही. काही शिक्षकांचे अहवाल आले तर काहींना काय अहवाल याची भीती.

यामुळे शिक्षकांसमोरही धोक्याची घंटा वाजली. शिक्षक दररोज अनेक वेळा मोबाईलवर मेसेज तपासून थकले तर मुख्याध्यापकांनीही आरोग्य विभागाला अनेकदा फोनवर विचारणा केली. फक्त येईल हे उत्तर मिळाले. मात्र निश्चित कधी अहवाल येतील हे संबंधितांना सांगता आले नाही. एखाद्या शिक्षकाचा अहवाल स्वॅब घेतल्यानंतर 7-8 दिवसांनंतर पॉजिटिव्ह आला तर तो किती लोकांच्या संपर्कात आला याचा शोध घेणे अवघड बाब आहे याचे कोणालाही गांभीर्य दिसत नाही.

शिक्षकांनी संमत्तीपत्रकांसाठी पालक-विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ते गोळा करण्यास सुरुवात केली. काही प्रमाणात ते जमा झाले. शिक्षण विभागाने पहिल्यादिवशी विविध विद्यालयांना भेटी देऊन माहिती घेतली. अनेक पालक आपले मुले - मुली करोनाची दुसरी लाट येणार, रुग्णांची संख्या वाढली या करोना संदर्भातील बातम्या - चर्चांमुळे विद्यालयात पाठवावे की नाही या संभ्रमात अडकलेले आहेत.

अनेक पालकांना एक मुलगा - मुलगी असल्याने ते जोखीम पत्करण्यास तयार दिसत नाहीत. ग्रामीण भागात बस सुरू झाल्या नसल्याने पालकांना विद्यालयात ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे. शेतीची कामे, कार्यालये, व्यवसाय, विविध रोजगार सांभाळून पाल्यांना कधी सोडायचे व कधी घरी घेऊन यायचे हा प्रश्न अनेकांसमोर आहे. काही प्रमाणात जे विद्यार्थी येऊ लागले आहेत ते स्वत: स्कुटी-बाईक वरून येत आहेत मात्र त्यांच्यातील कितीजणांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

इयत्ता 11-12 वी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे वय हे 17 वर्षांपर्यंतच असते. परिवहन विभागाच्या नियमांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम विद्यार्थी विद्यालयात येण्यावर होत आहे. यात संमत्तीपत्रके दिलेली सर्व विद्यार्थी उपस्थित राहत नाहीत हे वेगळेच.

खरे तर प्रत्यक्ष अध्यापन-अध्ययन करणे शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी सुखावह आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे, मूल्यमापन करणे हे सोपे जाते. ऑनलाईन अध्यापन-अध्ययन ही सर्वांसाठी नवीन प्रणाली असल्याने अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनासाठी राब राब राबावे लागते. पालकांना-विद्यार्थ्यांना सतत फोन करणे, चांगल्या कॅमेराचा मोबाईल घेणे, इंटरनेट रिचार्ज करणे, वरिष्ठांच्या् सूचनांचे पालन करणे व पुन्हा विद्यार्थी जॉईन होत नाहीत म्हणून बोलणे खाणे.

या ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी शासनाने अनुदानित विद्यालयांना कोणत्या मुलभूत सुविधा दिल्या हा प्रश्न आहे. विनाअनुदानित विद्यालये व शिक्षकांसमोर हा प्रश्न तर वेगळा व आव्हानात्मक आहे. विद्यालयांकडे व शिक्षकांकडे असणार्‍या जेमतेम सामुग्रीवर ऑनलाईनची लढाई चालू आहे. मात्र सुक्ष्म अभ्यास केला तर हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे नाकारता येणार नाही.

इंटरनेटचा खर्च, रेंज न मिळणे, एकाच कुटुंबातील 2-3 विद्यार्थी व सर्वांना अँड्रॉईड मोबाईल असे अनेक प्रश्न पालकांना सतावत आहेत. काही नवीन उपाययोजना केल्या तरी त्यात सातत्य राहत नाही. प्रयत्न आणि चुका यावर आधारित हा प्रकल्प कितपत यश देतो हे काळच ठरवणार आहे. प्रगतीच्या मार्गात आडवे आलेल्या करोनाच्या स्पी़डब्रेकरने दिलेला हा धक्का सर्वांसाठीच एक मोठा आघात ठरला आहे.

खरे तर शाळेची घंटा वाजविण्याचा मुहूर्त चुकला असे म्हणण्याची वेळ आली आहे. एक तर करोना लस आल्यानंतर हा निर्णय घेतला असता तर पालकांच्या मनातील भीती कमी झाली असती. तसेच विद्यालये सुरू करण्याअगोदर शिक्षण, आरोग्य, परिवहन महामंडळ या विभागांनी एकत्रित निर्णय घेणे गरजेचे होते.

अन्यथा करोना तपासणी, ग्रामीण भागातील बससेवा वेळेवर सुरू झाली असती. राज्यात सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एकाचवेळी परीक्षा घ्यावी लागेल तरी काही मोठ्या शहरांतील, जिल्ह्यांतील विद्यालये बंद व काही जिल्ह्यांतील चालू याचाही परिणाम पालकांच्या मनावर होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com