
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या शाळा आजपासून (दि. 15) सुरू होणार असून पहिल्याच दिवशी नव्याने दाखल होणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी तालुकानिहाय शाळांना भेट देणार आहेत. मोठ्या कालखंडानंतर विद्यार्थी शाळेत येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
शाळेत प्रवेश घेणार्या बालकाला उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण मिळाले तर त्याची शाळेबद्दलची गोडी वाढेल. परिणामत: बालकांची उपस्थिती, त्याचा शालेय उपक्रमातील सहभाग व एकंदरितच दर्जेदार शिक्षण घेणे यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. याच भूमिकेतून यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिवशी शाळा सुरू होताना सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नव्याने प्रवेशित होणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव या अभिनव प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी पावणेदहा वाजता तालुक्यातील शाळांना भेट द्यायची आहे. या भेटीत अधिकार्यांनी दाखलपात्र मुलांचे प्रवेश, शाळाबाह्य मुलांचे प्रवेश तपासायचे आहेत. शाळा व्यवस्थापन समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेष वितरण, नवागतांचे स्वागत, विद्यार्थी उपस्थिती आदी बाबींचा आढावा घ्यायचा आहे.
याशिवाय शाळाबाह्य मुलांच्या घरी भेट देऊन त्यांना शाळेत दाखल करण्यास प्रेरीत करायचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कराव पाटील हेही बुधवारी सकाळी काही शाळांना भेटी देऊन शाळांची तयारी, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सर्वच शिक्षकांनी प्रवेशोत्सव व मुलांच्या स्वागताची तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जाणार आहेत.