शालेय पोषण आहार खर्च मर्यादेत दरवाढ

शालेय पोषण आहार खर्च मर्यादेत दरवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद व राज्य शासनाच्या सहकार्याने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. केंद्र शासनाने 2020-21 या आर्थीक वर्षापासून खर्च मर्यादेत दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार राज्य शासनानेही 10.99 टक्के दरवाढ केली आहे. त्यामध्ये सुधारित दरानुसार प्राथमिक शाळेतील प्रति लाभार्थीला 4 रू.97 पैसे व उच्च प्राथमिकच्या प्रति लाभार्थीला 7 रू. 45 पैसे मिळणार आहेत. सुधारित दर 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत.

राज्यामध्ये शालेय पोषण आहार ही योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिली ते पाचवीच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथीनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.

तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजविण्याच्या दरासाठी प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गासाठी 4 रू. 48 पैसे व सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गासाठी 6.71 रू. प्रमाणे निश्चित करण्यात आली होती. केंद्रशासनाने सन 2014-15 या आर्थीक वर्षापासून या खर्च मर्यादेत 7.5 टक्के दरवाढ मंजूर केली. यानुसार राज्य शासनानेही विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार दरवाढ करण्यास मान्यता दिली आहे.

प्राथमिकसाठी आहाराचे प्रमाण 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिने यासाठी प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा 4 रू. 97 पैसे व प्रतिदिन लाभार्थी आहाराचा दर 4 रू. 97 पैसे असा करण्यात आला आहे. तर उच्च प्राथमिकसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम आहारासाठी प्रतिदिन लाभार्थी आहारखर्च मर्यादा 7 रू. 45 पैसे व प्रतिदिन लाभार्थी आहार दर 7 रू. 45 पैसे करण्यात आला आहे. शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, बचत गट यांच्यामार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करून तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱया यंत्रणेस प्राथमिकसाठी 4.97 रूपये तर उच्च प्राथमिकसाठी 7.45 रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

सर्व शाळांना मिळणार शासनाकडून गॅस कनेक्शन

शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेत आहार शिजविणार्‍या महिला मदतनिसांची आता चुलीच्या धुरातून मुक्तता होणार असून, राज्य शासनाने गॅस नसलेल्या सर्व शाळांना गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2021 पर्यंत नगर जिल्ह्यासह राज्यातील अशा 40 हजार 152 शाळांना गॅस उपलब्ध होणार आहे. यासाठी 40 हजार 152 शाळांना एका कनेक्शनसाठी 4090 या प्रमाणे 16,42,21,380 रुपये खर्च करण्यास प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांना मान्यता देण्यात आली आहे. गॅस नोंदणी व वापराच्या सूचना पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे. तथापि शाळांना गॅस नोंदणी व वापराच्या सूचना असलेले पुस्तक संबंधित महामंडळाकडून मोफत देण्यात येणार आहे. नवीन गॅस जोडणी व प्रात्यक्षिक यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. ते शुल्क शाळांना आकारले जाणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com