वर्षभरातील शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती गठीत || 4 हजार 544 शाळांचे रेकॉर्ड तर 5 टक्के शाळांमधील पालक-विद्यार्थ्यांचे जबाब होणार
वर्षभरातील शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपासून ते दिल्लीच्या लोकसभेत जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचा विषय पोहचल्याने अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी गेल्या वर्षभरातील शालेय पोषण आहार वाटपाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीत जिल्ह्यातील 4 हजार 544 शाळांमधील पोषण आहाराचे रेकॉड, तर 5 टक्के शाळांमधील पालक आणि विद्यार्थ्यांकडे पोषण आहाराबाबत विचारणा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 2020-21 मध्ये 4 हजार 544 शाळांमध्ये 40 कोटी रुपयांचा पोषण आहार वितरित करण्यात आलेला आहे. या आहाराच्या वितरणात अनियमितता असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या हिवरेबाजार येथे झालेल्या सभेत झाला होता. याबाबतचे वृत्त दै. सार्वमतने ठळकपणे प्रसिध्द केलेले होते. संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य महेेंद्र घोडगे यांनी शालेय पोषण आहाराची किराणा दुकानावर विक्री होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोषण आहाराचा विषय लोकसभेत खा.डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित केला होता. तसेच राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी देखील नगर जिल्ह्यातील शालेय पोषण आहार वितरणाची चौकशी करण्याची सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांना केल्या होत्या.

त्यानूसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यांच्या मदतीला प्रत्येक तालुक्याला देखील स्वतंत्र तालुकास्तरीय समिती राहणार आहे. या समिती सहायक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकारी राहणार आहेत. या दोनही समित्या 4 हजार 544 शाळांपैकी 50 टक्के शाळांना प्रत्यक्षात भेटी देवून त्याठिकाणी पोषण आहाराचे रेकॉर्ड तपासणार आहेत. तर 50 टक्के शाळांचे रेकॉर्ड हे तालुक्याच्या ठिकाणी बोलावून तपासणार आहेत.

तर जिल्ह्यातील एकूण शाळांच्या 5 टक्के शाळांच्या पालक आणि विद्यार्थ्यांचे जबाब घेवून पोषण आहार वेळ आला की नाही? की मिळाच नाही याबाबत थेट विचारणा करणार आहेत. साधारणपणे एक महिना ही चौकशी सुरू राहणार असल्याचा अंदाल आहे. या चौकशीचा अहवाल 15 फेबु्रवारीपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार आहेत. जिल्हास्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी लांगोरे असून सदस्य सचिव शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील आहेत. महिला बालकल्याण अधिकारी मनोल ससे हे समितीचे सहअध्यक्ष राहणार आहेत. तर उप लेखाधिकारी राजू लाकूडझोडे, लेखाधिकारी योगेश आंब्ररे हे सदस्य आहेत.

या कालावधीतील होणार चौकशी

एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात जिल्ह्यात वर्षभरात चार वेळा पोषण आहाराचे वाटप झालेले आहे. यात उन्हाळ्यातील सुट्टी, जून ते ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंंबर आणि डिसेेंबर ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात पोषण आहार वाटप करण्यात आलेला आहे. दरम्यान कोविडच्या पहिल्या लाटेनंतर काही काळ शाळा सुरु असतांनाही जिल्ह्यात 19 कोटी रुपयांचा पोषण आहार वाटप झाला होता. मात्र, कोविडच्या दुसर्‍या लाटे जवळपास सर्वच शाळा बंद असतांनाही पोषण आहार वाटपाचे 40 कोटींचे बिल काढण्यात आलेले आहेत.

अशी होणार चौकशी

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनूसार करण्यात आलेली पोषण आहारची मागणी, मागणीनूसार किती पोषण आहार प्राप्त झाला. त्यानंतर विद्यार्थी संख्येनूसार त्याचे विद्यार्थ्यांपर्यंत वाटप झाले की नाही. तसेच शाळा बंद असतांना लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत संबंधीत पोषण आहार कसा पोहचला या मुद्द्याची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी विशिष्ट नमुने तयार करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com