लॉटरी पध्दतीने होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

प्रत्येक तालुक्यातून दोन केंद्रांतील शाळांची करणार निवड
लॉटरी पध्दतीने होणार शालेय पोषण आहाराची तपासणी
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शालेय पोषण आहाराच्या तक्रारी वाढत असून पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची लॉटरी पध्दतीने निवड करून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. लॉटरीत निवड होणार्‍या शाळांची अचानक तालुकास्तरावर असणार्‍या पोषण आहार तपासणी पथका मार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा झाली. यात पोषण आहाराच्या तपासणीचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहाराच्या तपासणीत निवड होणार्‍या शाळेतील पोषण आहाराचे सर्व अभिलेखे आणि अनुषंगिक बाबी यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यास एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्यासह सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने सजगतने काम करावे, असे आदेश यावेळी देण्यात आले.

आगामी काळात शिक्षक व केंद्र प्रमुख यांची पुरस्कारासाठी निवड करतांना घेण्यात येणार्‍या प्रश्नावलीमध्ये संबंधीत शिक्षक अध्यापन करत असलेल्या वर्गातील अधिकाअधिक प्रश्नावलीचा समावेश करण्याच्या सुचना देण्यात आल्या. यासाठी जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना जास्तीजास्त सहभाग होता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच खासगी अनुदानीत प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये यांनी शंभर टक्के नियोजन करावे, असे यावेळी सुचित करण्यात आले. येत्या महिनाअखेर सर्व स्वयंअर्थसहायीत शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, अभिलेखे यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. सभेला सदस्य राजेश परजणे, जालींदर वाकचौरे, मिलींद कानवडे, विमल आगवण, उज्वला ठुबे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.