शाळांची अवाजवी फी बंद करा

वंचित आघाडीच्या जगधने यांची मागणी
शाळांची अवाजवी फी बंद करा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

शैक्षणिक वर्षासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुकर व माफक होण्यासाठी तसेच गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत प्रवेश मिळवून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने व सामाजिक संघटनेच्यावतीने पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले, राहुरी तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक, खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश दरम्यान अवास्तव फी मागणी करून सर्वसामान्य गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याबाबत आपण तात्काळ सर्व शाळांना महाविद्यालयांना आदेश काढून सूचित करावे. तसेच सर्व शाळेच्या दर्शनी भागात त्याबाबत फलक लावण्यात यावा व प्रवेश प्रक्रिया सुकर व माफक व्हावी.

करोना महामारीने सर्वांचे जीवन विस्कळीत केले.त्यामुळे सर्वांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. अनेक गोरगरीब मुलांच्या शालेय प्रवेशाबाबत आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मुलांना प्रवेश देताना कोणत्याही शाळेने अवास्तव फी वसूल करू नये व सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. याबाबत शासनाच्या नियमानुसार संबंधित सर्व शाळा महाविद्यालयांना आपण तात्काळ सूचना कराव्यात व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी. येत्या दोन-तीन दिवसातच सर्व शाळांना आपण याबाबत पत्रक काढावे व योग्य प्रशासकीय कारवाई करावी, असे न झाल्यास संबंधित माध्यमिक व प्राथमिक शाळेतच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केले जातील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने यांनी दिला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, सचिन साळवे, तुषार दळवी, स्वप्निल गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com