शाळा, कॉलेज सुरू पण एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

जिल्ह्यात 475 बसेस सुरू झाल्याचा परिवहन महामंडळाचा दावा
शाळा, कॉलेज सुरू पण एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य परिवहन मंडळाची एसटी बस बंद झाल्या. त्या अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागात

प्रवाशांचे हाल सुरू आहेत. गत दोन महिन्यांपासून नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागात बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी येत आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यात 475 एसटी बसेस सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र वस्तूस्थितीमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने परिवहन मंडळ पूर्ण क्षमतेने बसे सुरू करत नसल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊनच्या काळात मार्च ते जून असे साधारण चार महिने एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती. परंतु त्यानंतर हळूहळू बस सुरू करण्यात आल्या. सध्या तालुक्याच्या ठिकाणी, तसेच मोठ्या, बाजारपेठेच्या गावांपर्यंत बससेवा सुरू आहे. परंतु पूर्वीप्रमाणे खेड्यापाड्यांत बस अद्यापही सुरू नाहीत. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी व गेल्या आठवड्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये पाच ते सहा महिने विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईलसह इतर साधने नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विशेषत: दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष लक्षात घेता, त्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊनच अध्ययन करावे लागत आहे, परंतु बहुतांश ठिकाणी बस सुरू नसल्याने, विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. नाईलाजास्तव काही विद्यार्थ्यांनी

खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे.

नगर विभागात अकरा आगार असून, त्यातून सध्या 475 बस धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी जिल्हाभर 652 बस धावत होत्या. म्हणजे अजूनही 177 बस बंद असून, त्या ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थ्यांकडून मागणी आल्यानंतर बस सुरू केल्या जातील, असे महामंडळाचे म्हणणे असले, तरी अजूनही अनेक मार्गांवर तोट्यात बस धावत असल्याने महामंडळाने पूर्वीप्रमाणे बससेवा अद्यापही सुरू केलेली नाही. ती कधीपर्यंत सुरू होईल, हेही अद्याप निश्चित नाही.

................

दुसरीकडे मुंबईतील लोकल बंद असल्याने बेस्टवर प्रवासी वाहतुकीचा तान वाढ होता. यासाठी जिल्ह्यातून बेस्टच्या मदतीला 125 बसेस पाठविण्यात आल्या होत्या. यातील जवळपास निम्म्या बसेस या मुंबईत सेवा देत आहेत. या बसेस आल्यानंतरच जिल्ह्यात पूर्वी प्रमाणे बस सेवा सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील बड्या गावात प्रवाशांकडून मागणी आल्यानंतर अथवा मोठ्या संख्याने विद्यार्थ्यांनी पासेस काढल्यानंतर त्या मार्गावर बस सेवा देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

...................

नगर विभागातील आगार - 11

एकूण बस - 690

सध्या सुरू बसेसे प्रवाशी- 475,

मुंबईला बेस्टसाठी 60,

लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या बसेस- 652

................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com