गतवर्षीच्या तुलनेत यंदा शिष्यवृत्तीच्या निकालात वाढ

पाचवीचा 27.19 टक्के तर आठवीचा निकाल 13.23 टक्के
गतवर्षीच्या तुलनेत यंदा शिष्यवृत्तीच्या निकालात वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. यात मागील वर्षीपेक्षा निकालात सुधारणा झाली असून पाचवीचा निकाल 27.19 टक्के, तर आठवीचा निकाल 13.23 टक्के लागला आहे.

यंदा शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्टमध्ये झाली. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) जिल्ह्यातून 32 हजार 248 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यातील 30 हजार 292 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित, तर 1 हजार 956 विद्यार्थी अनुपस्थित होते. यात 8 हजार 236 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. हे प्रमाण 27.19 टक्के आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल केवळ 15.72 टक्के लागला होता. यात जवळपास दुप्पट वाढ होऊन यंदा निकाल 27.19 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर दुसरीकडे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) जिल्ह्यातून 20 हजार 32 विद्यार्थी बसले होते.

त्यातील 18 हजार 821 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित, तर 1 हजार 211 विद्यार्थी अनुपस्थित होते. यापैकी 2 हजार 490 विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. हे प्रमाण 13.23 टक्के एवढे आहे. मागील वर्षी आठवी शिष्यवृत्तीचा निकाल 11.43 टक्के लागला होता. यावर्षी यात दोन टक्क्यांनी वाढ होत हा निकाल 13.23 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यातील 490 शाळांचे निकाल शून्य टक्के लागले होते. यंदा निकाल सुधारल्याने शून्य टक्केवारीच्या शाळाही कमी होतील, अशी शक्यता आहे. सविस्तर निकाल लवकरच जाहीर होईल. त्यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार आहे.

मागील वर्षी आठवीच्या 15 हजार 176 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यात यंदा 3 हजार 645 विद्यार्थ्यांची वाढ होत यंदा 18 हजार 821 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यानंतर पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा मागील वर्षी 26 हजार 632 विद्यार्थ्यांनी दिली होती. यंदा त्यातही 3 हजार 660 विद्यार्थ्यांची वाढ होत हा आकडा 30 हजार 292 पर्यंत गेला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com