पाचवीचे 4 हजार तर आठवीचे अडीच हजार विद्यार्थीची दांडी

शिष्यवृत्तीच्या परीक्षा : शिक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार
पाचवीचे 4 हजार तर आठवीचे अडीच हजार विद्यार्थीची दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तिन वेळा पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षाअखेर रविवार (दि.31) नगर जिल्ह्यात सुरळीत पारपडली. मात्र, परीक्षेला पाचवीच्या 3 हजार 930 तर आठवीच्या 2 हजार 450 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. यामुळे गैरहजर राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडून मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील परीक्षेचा शुल्क वसूल करण्यात येणार याकडे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष राहणार आहे.

रविवारी जिल्ह्यात 372 केंद्रावर इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि इयत्ता आठवीचे (पूर्व माध्यमिक) अशा दोन परीक्षा सुरळीत पारपडल्या. या परीक्षेसाठी 52 हजार 289 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. यापैकी पाचवी आणि आठवी मिळून पहिल्या पेपरला 49 हजार 100 विद्यार्थी हजार होते. तर दुसर्‍या पेपरसाठी 49 हजार 98 विद्यार्थी हजर होते. परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या 17 हजार 551 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क 29 लाख 99 हजार हा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यात आला होता.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची तब्बल 11 वेळा ऑफ आणि ऑनलाईन सराव परीक्षा घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी परिक्षा केंद्र निश्चित करतांना येण्या-जाण्याच्यास सोयीस्कर अशा शाळांची परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.दरम्यान, गैरहजर असणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषदेचपेक्षा खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गैरहजर असणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांवर कारवाई करत त्यांच्याकडून परीक्षा शुल्क वसूल करण्याचा निर्णय वरिष्ठांना विचारून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात भाषा आणि गणित या विषयांचा पेपर असून त्यासाठी 75 प्रश्न आणि 150 गुण असणार आहेत. तसेच दुपारच्या सत्रात होणार्‍या दुसर्‍या पेपर भाषा व बुध्दीमत्ता चाचणीचा होता. त्यासाठी 75 प्रश्न आणि 150 गुण होते.

असे आहेत गैरहजर, कंसात दुसर्‍या पेपरचे विद्यार्थी

इयत्ता पाचवी- नगर 123 (132), संगमनेर 179 (178), नेवासा 177 (178), पाथर्डी 155 (155), पारनेर 103 (103), राहुरी 180 (178), कर्जत 68 (68), जामखेड 87 (87), कोपरगाव 141 (141), श्रीरामपूर 108 (107), अकोले 178 (175), श्रीगोंदा 112 (113), शेवगाव 92 (92), राहाता 156 (155), मनपा 100 (100).

इयत्ता आठवी- नगर 52 (52), संगमनेर 96 (96), नेवासा 81 (81), पाथर्डी 91 (93), पारनेर 78 (78), राहुरी 113 (113), कर्जत 77 (77), जामखेड 66 (66), कोपरगाव 139 (140), श्रीरामपूर 58 (58), अकोले 85 (85), श्रीगोंदा 63 (62), शेवगाव 63 (62), राहाता 93 (98), मनपा 67 (67).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com