
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलल्याने जिल्ह्यातील 47 हजार विद्यार्थ्यांना ऐन करोना संकटात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात या परीक्षेसाठी मागील पंधारवड्यात केंद्रनिश्चितीही करण्यात आली होती.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. परंतु 23 मे रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक संघटनांनी तसेच पालकांनीही परीक्षा घेऊ नये किंवा पुढे ढकलावी याबाबत मागणी केली होती. शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी केंद्र निश्चितीचे काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यात 368 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. दरम्यान सोमवारी परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर्तास तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.