प्रशासकीय सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाजन करावे - बखळे

File Photo
File Photo

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

प्रशासकीय सोयीसाठी विद्यार्थी व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सेवकांचे हित लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी प्राचार्य डॉ. एस. आर. बखळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे केली.

पुणे विद्यापीठ अधिनियम 1948 अन्वये या विद्यापीठाची स्थापना झालेली असून या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो. विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर व नाशिक येथे उपकेंद्रे आहेत. विद्यापीठाशी संलग्नित एकूण 776 सलंग्न महाविद्यालयापैकी 27 मुलींची महाविघालये, 527 पदव्युत्तर केंद्रे, 30 स्वायत महाविद्यालये, 176 मान्यता प्राप्त संस्था, 79 संशोधन परिसंस्था आणि 20 इतर संस्था असून विद्यापीठ परिसरामध्ये 45 विद्यापीठ शैक्षणिक विभाग, 16 विद्यापीठ संस्था आहेत. तसेच एकूण विद्यार्थी संख्या प्रतिवर्षी सुमारे 7 लाख आहे. यावरून विद्यापीठाचा विस्तार किती मोठा आहे याची कल्पना येते. विशेषतः नाशिक व अहमदनगर येथे विद्यापीठाने उपकेंद्रे सुरु केलेली असली तरी महत्वाच्या कामासाठी सर्वाना पुणे येथेच जावे लागते.

नाशिक व अहमदनगर येथील विद्यार्थी वर्गाला ते दिवसेंदिवस गैरसोयीचे व अडचणीचे ठरत आहे. त्यासाठी काळाची गरज ओळखून नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने शिर्डी या मध्यवर्ती ठिकाणी साईबाबांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ सुरु करावे, अशी मागणी प्राचार्य डॉ. बखळे यांनी केली असून राज्य सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात विशेष जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com