
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खासगी जागांवर ताबेमारीचे प्रकार नगर शहरात नेहमी गाजत असतात. पण आता वेगळाच एक प्रकार पुढे आल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेसारख्या शासनाच्याच संस्थेच्या क्रीडांगणावर शासनाचाच भाग असलेल्या महसूल विभागाने ताबेमारी केल्याचे सांगितले जात आहे.सावेडीतील महापालिकेच्या क्रीडांगणावर विविध कारणाने जप्त केलेली वाहने लावल्याने खेळाडूंनी खेळावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सावेडीतील गंगा उद्यान मागील क्रीडांगणावर महसूल विभागाने जप्त केलेल्या गाड्या लावल्यामुळे याठिकाणी खेळत असलेल्या खेळाडूंना खेळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकामागील जॉगिंग ट्रॅक मैदानावर अनेक लहान मुले व तरुण मुले खेळत असल्याने व ही जागा अपुरी पडू लागल्याने गंगा उद्यानामागील मैदानात क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी अशा खेळांची प्रॅक्टिस चालू असते. मात्र येथे जुन्या आणि भंगार गाड्या लावल्यामुळे पालक मुलांना याठिकाणी पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर काढाव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे.
तहसील कार्यालयामागील जागेवर महसूल भवन बांधण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. या जागेवर काही वर्षांपासून महसूल विभागाने कारवाई केलेल्या वाळू डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक अशा अनेक गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. महसूल भवनाच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे या सर्व गाड्या गंगा उद्यानामागील मोकळ्या मैदानावर लावण्यात आल्या आहेत.