सावेडी कचरा डेपोवरून पुन्हा घमासानची शक्यता
सार्वमत

सावेडी कचरा डेपोवरून पुन्हा घमासानची शक्यता

बुरूडगावला स्थलांतर करण्यास विरोध : महासभेतून विषय वगळण्याची मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

कचरा डेपोवरून पुन्हा एकदा राजकीय घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावेडीत कचरा डेपो नको, म्हणून मध्यंतरी विविध पक्ष आक्रमक झाले होते. यात राजकीय दबाव आल्याने महापालिका प्रशासनाने सावेडीतील कचरा डेपो बुरूडगाव कचरा डेपोवर स्थलांतरित करण्याच्या हालचाली केल्या.

त्यानुसार सभेपुढे विषय आणताच आता बुरूडागावच्या नागरिकांसह या रस्त्यावरील नागरिक आक्रमक झाले आहेत. या विषयास त्यांनी विरोध केला असल्याने भविष्यात यावरून पुन्हा राजकीय कुरघोड्या होण्याची शक्यता आहे.

सावेडी उपनगरासाठी वडगाव गुप्ता रस्त्यावर कचरा डेपो उभारण्यात आला आहे. मात्र कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मध्यंतरी कचरा डेपोला आग लागण्याचेही प्रकार झाले होते. ही आग लागली की लावली गेली, याबाबतही शंका उपस्थित केल्या गेल्या.

एवढेच नव्हे, तर महापालिकेत कोणाची सत्ता असताना सावेडीत कचरा डेपो झाला, असा प्रश्न उपस्थित करून महापालिका निवडणुकीत तो एक प्रचाराचा मुद्दा करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी या कचरा डेपोच्या विरोधात आक्रमक होती. मात्र याच पक्षाच्या काही नगरसेवकांचा हा कचरा डेपो बुरूडगाव कचरा डेपोवर स्थलांतरित करण्यास मूक विरोध आहे. सावेडीत कचरा डेपो नको, यावर महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर ठाम आहेत.

आता हा कचरा डेपो बुरूडगावला स्थलांतरित करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी या संदर्भात निवेदन महापालिकेला दिले आहे. कचरा डेपो बुरुडगाव येथे स्थलांतरित करण्याचा मनपा महासभेत विषय असून यास बुरूडगाव रस्त्यावरील नागरिकांचा विरोध असल्याचे त्यांनी निवेदन दिले आहे.

निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अरुण शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की हरित लवादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपो येथे 100 टनी कचरा प्रकल्प चालू झाला असून, नव्याने सावेडी येथील 50 टन कचरा प्रकल्प सावेडी येथेच आहे त्याच ठिकाणी उभारण्याचा आदेश दिलेला आहे.

सावेडी कचरा प्रकल्पासाठी महापालिकेमार्फत आजपर्यंत अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी (रस्ते, कंपाउंड, शेड) खर्च केला असून, तो व्यर्थ जाणार आहे. तसेच सावेडी ते बुरुडगाव हे अंतर 10 कि.मी. असून, तेथील कचरा वाहतुकीचा खर्च अवाढव्य आहे. त्याचा भार नागरिकांवर पडणार आहे. तसेच मनपा झाल्यानंतर शहराच्या चारही झोनमध्ये कचरा डेपो, अमरधाम, विविध कामांसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. मोठ्या शहरामध्ये कचर्‍याची विल्हेवाट त्या त्या विभागातच लावली जाते.

आज शहरामध्ये कुठेही कचरा कुंडी ठेवण्यास विरोध होत असताना बुरुडगावला ग्रामस्थ मात्र मनपाच्या कचर्‍यापासून त्रस्त आहेत. प्रदूषणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. बुरुडगाव साथीच्या रोगांना बळी पडत आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रकल्पाच्या स्थलांतरास बुरुडगावकरांचा विरोध आहे.

त्यामुळे हा विषय महासभेतूनच वगळावा, अन्यथा बुरुडगावकर आंदोलन हाती घेतील, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर माजी महापौर भगवान फुलसौंदर, अरुण शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट, माजी नगरसेविका कांताबाई शिंदे आदींच्या सह्या आहेत.

बुरूडगावकरांच्या हितासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले यांनी वेळोवेळी महासभेमध्ये भूमिका घेतलेली आहे. सावेडीचा कचरा डेपो हलवावा म्हणून आ. संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महापालिकेत आंदोलन केलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीची आता काय भूमिका असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com