पत्ता विचारण्यासाठी आले अन् दागिने घेऊन गेले

सावेडी उपनगरातील घटना || पोलिसांत गुन्हा
पत्ता विचारण्यासाठी आले अन् दागिने घेऊन गेले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरासमोरील गेटवर उभ्या असलेल्या वृध्द महिलेकडे पत्ता विचारण्यासाठी आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅमचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. बुधवारी (7 जून) सकाळी आठ वाजता सावेडी उपनगरातील गणेश कॉलनीत आदर्श बिल्डींगसमोर ही घटना घडली.

याप्रकरणी सुनंदा नंदकुमार चिंतामणी (वय 62 रा. गणेश कॉलनी, आदर्श बिल्डींगसमोर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी त्यांच्या घरासमोर गेटवर एकट्याच उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे दुचाकीवरून दोघे आले. त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने एक चिठ्ठी फिर्यादीला दाखवून अग्रवाल कुठे राहतात, असे विचारले.

फिर्यादीने त्यांना पाईपलाईन रोडच्या पाठीमागे जा, तेथे तुम्हाला अग्रवाल भेटतील, असे सांगितले. त्यानंतर लगेच पत्ता विचारणार्‍या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढले. फिर्यादीने ते पकडून ठेवले असता त्यातील काही भाग त्या चोरट्यांनी लंपास केला आहे. फिर्यादीने आरडाओरडा करण्यापूर्वीच ते दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. फिर्यादीचे अंदाजे 12 ग्रॅमचे गंठण चोरीला गेले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com