
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जावई सुरेश विलास निकम (वय 32) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (वय 24) या दोघांनी मिळून सासुरवाडीत येऊन धारदार शस्त्राने घरातील 6 व्यक्तींवर हल्ला केला. त्यातील 3 व्यक्तींचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर उर्वरित 3 व्यक्ती या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना शिर्डीपासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या सावळीविहीर गावात बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, हल्ला करणार्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या 5 तासांत शिताफीने अटक केली असून या तिहेरी हत्याकांडाने सावळीविहीर हादरून गेले आहे.
सावळीविहीर गावातील चांगदेव गायकवाड यांची मुलगी वर्षा हिचा विवाह संगमनेर येथील सुरेश निकम यांच्याबरोबर 8 वर्षांपूर्वी झाला होता. ती काही दिवसापूर्वी सावळीविहीर येथे आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन आली होती. बुधवारी रात्री सुरेश निकम (वय 32) व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम हे सावळीविहिर येथे आले. आल्या आल्या त्यांनी सासुरवाडीच्या घराचा दरवाजा ठोठावला. हा दरवाजा उघडताच या दोघांनी जो समोर येईल त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला सुरू केला.
यात सुरेश निकमची पत्नी वर्षा गायकवाड (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25) व आजी सासू हिराबाई धृपद गायकवाड (वय 77) यांचा मृत्यू झाला. तर सासू संगीता चांगदेव गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व मेव्हणी योगीता महेंद्र जाधव हे तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच रात्री तातडीने पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी घटना स्थळावर जाऊन सर्व माहिती घेऊन तातडीने आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करत आरोपी सुरेश निकम व त्याचा भाऊ हे दोघे पळून जाण्याच्या उद्देशाने नाशिक रोडकडे मोटारसायकलवरून जात असताना नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, संदीप चव्हाण, विशाल दळवी, जालिंदर माने, दत्तात्रय हिंगडे चालक संभाजी कोतकर यांनी नाशिक येथील पोलिसांच्या मदतीने आरोपींचे लोकेशन तपासून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले असल्याचे समोर आले. आरोपी सुरेश निकम हा संगमनेरचा असून तो त्या ठिकाणी हमालीचे काम करतो. सावळीविहीर येथे मयत पत्नी हिचे माहेर होते. मात्र काही दिवसांपूर्वी सासुरवाडीत सुरेश निकम याचे वाद झाले होते आणि त्याचाच मनात राग धरून बुधवारी रात्री मोटारसायकल वरून सुरेश निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याने सावळीविहीर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास येऊन घराचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडताच दोनही आरोपींनी धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली.
काही कळायच्या आत हे हत्याकांड करून ते पसार झाले. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी आरडाओरड सुरू झाली. शेजारील लोक मदतीसाठी धाऊन आले व हल्ल्यातील सर्व सहा जणांना शिर्डी येथे सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
आरोपी सुरेश विलास निकम व रोशन कैलास निकम या दोघानाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 302, 307, 506 व 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सावळीविहीर गावात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून इतके मोठे हत्याकांड होण्याची ही पहिलीच घटना आहे.
या घटनेतील आरोपीची मयत झालेली पत्नी वर्षा हिला आठ वर्षे वयाची एक व सहा महिन्यांची एक अशा दोन मुली आहेत. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलींच्या डोक्यावरचे छत्र हरपले.या घटनेमुळे अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
आरोपी सुरेश व रोशन यांना पकडून शिर्डी पोलीस ठाण्यात आणले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेला अंजाम दिल्यानंतर आरोपी मोटारसायकलने नाशिक गाठून नाशिक रेल्वे स्टेशनवरून मिळेल त्या गाडीने परराज्यात परागंदा होणार होते, असे त्यांनी सांगितले.