जिल्ह्यातील शेतकरी कृषी सौरपंप योजना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत

नगरसह राज्यातील 16 जिल्ह्यांत योजना सध्या बंद
जिल्ह्यातील शेतकरी कृषी सौरपंप योजना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सध्या शासनाच्या कृषी सोलर पंप योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतातील पिकांची पाण्याची भूक वाढली आहे.

जवळपास सर्व शेतकर्‍यांकडे सध्या तरी बर्‍यापैकी पाणी उपलब्ध आहे,पण विजेच्या समस्येने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागा अंतर्गत आपले सरकार महा डीबीटी ऑनलाईनद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत होते. पण जिल्ह्यात मागील एक वर्षांपासून ही योजना बंद आहे.

राज्यातील 16 जिल्हे या योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यात विशिष्ट प्रवर्गातील जाती वगळता ही योजना बंद आहे. विशिष्ट प्रवर्गातील जातीला सुरू असले तरी संकेतस्थळ कायमस्वरूपी लोडवर असते. त्यामुळे त्या योजनेत सहभाग नोंदविण्या करिता शेतकर्‍यांची डोकेदुखी होत आहे. त्यामुळे मागेल त्याला सौरऊर्जा प्राप्त करून दिला जाईल असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही योजनेचा कितपत शेतकर्‍यांना फायदा झाला हा प्रश्न देखील शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

जवळपास तीन योजने अंतर्गत ही योजना सुरू केली. त्यात मुख्यमंत्री सोलर पंप योजना, कुसुम सोलर योजना, महाडीबीटी सोलर पंप योजना अशा तीन वेगवेगळ्या नावाने योजना सुरू असल्या तरी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने ही एकच योजना आहे. या तिन्ही योजनेत राज्य व केंद्र सरकारचा सहभाग आहे. राज्य व केंद्र सरकारच्यावतीने ही सर्व योजना 90 टक्के अनुदानित तत्वावर सुरू आहे. मागील वर्षात जिल्ह्यातील बर्‍याच शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवला होता. आता त्याआधारे त्यातील अनेक शेतकर्‍यांना अनुदानित तत्वावर कृषी सोलर पंप मिळाले आहे व काही ते प्रणालीत आहे. महावितरणने ही योजना जिल्ह्यासाठी त्वरित सुरू करावी अशी मागणी सध्या शेतकरी करीत आहे.

3 अश्वशक्तीचा पंपाची मूळ किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये आहे. 90 टक्के अनुदान वगळता शेतकर्‍यांना फक्त 19 हजार 380 रुपये भरावे लागतात. जवळपास पावणेतीन लाख रुपये मूळ किमतीच्या पंपासाठी अनुदान वगळता शेतकर्‍यांना 26 हजार 975 रुपये भरावे लागतात तर साडेसात अश्वशक्तीच्या जवळपास पावणेचार लाख रुपये किंमतीच्या पंपासाठी अनुदान वगळता अवघे 37 हजार 440 रुपये भरावे लागतात.

सध्या ग्रामीण भागात विजेची समस्या भेडसावत असल्याने महावितरणने कृषी सोलर पंप ही 90 टक्के अनुदानित तत्वावरील योजना त्वरित सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदवून या योजनेत शेतकर्‍यांना सहभागी करून घेतले तर भविष्यात वीज टंचाईवर सहज मात करता येईल.

- बाळासाहेब शिंदे संचालक, अशोक कारखाना, पाचेगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com